प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 76% रक्कम क्षमता विकासावर केले खर्च
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025
कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारताला सेवा देणारी भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था म्हणून स्वत:मध्ये परिवर्तन घडवून, भारतीय रेल्वेने हे काम मिशन मोडमध्ये हाती घेतले आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीशी मेळ साधत, भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिने आणि चार दिवसांमध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 76 टक्के रक्कम खर्च केली आहे. भारतीय रेल्वेने 5 जानेवारी 2025 पर्यंत केलेल्या खर्चाच्या ताज्या अहवालानुसार, भारतामध्ये रेल्वे प्रवासाचा अनुभव जागतिक दर्जाचा बनवण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन, या काळात रेल्वेने क्षमता विकासाकरता मोठी गुंतवणूक केली.
गेल्या दशकभरात केलेल्या सातत्त्यपूर्ण भांडवली खर्चाची फळे दृष्टीपथात आली असून, 136 वंदे भारत गाड्या, ब्रॉडगेजचे 97 टक्के विद्युतीकरण, नवीन मार्गांचे बांधकाम, गेज रूपांतरण, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, वाहतूक सुविधांची कामे, सार्वजनिक सुविधा आणि महानगर वाहतुकीमधील गुंतवणूक, हे याचे उदाहरण आहे. या भांडवली खर्चामुळे कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव मिळत आहे. ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेन (शयनयान गाड्या) स्पीड टेस्टिंग (वेगाची चाचणी) आणि सेफ्टी सर्टिफिकेशनच्या (सुरक्षा प्रमाणपत्र) टप्प्यावर आल्या असून, भारतातील रेल्वे प्रवाशांना लवकरच लांब पल्ल्याच्या प्रवासात जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल. यामुळे एकूणच प्रवासाच्या अनुभवात क्रांती घडेल. भारतीय रेल्वेचे हे परिवर्तन विकसित भारताचा दृष्टीकोन आणि भारतीय रेल्वेने मिशन मोड मध्ये आधुनिकीकरण प्रकल्पांवर खर्च करून या दृष्टीकोनाची त्वरित अंमलबजावणी केल्यामुळे शक्य झाले.
या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या चार दिवसांत केलेल्या 1198 कोटी भांडवली खर्चासह, आर्थिक वर्षाचे केवळ तीन महिने शिल्लक असताना भारतीय रेल्वेने केलेला एकूण भांडवली खर्च सुमारे 76 टक्के इतका आहे.
2024-25 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात रेल्वेचा एकूण भांडवली खर्च 2,65,200 कोटी रुपये असून एकूण अर्थसंकल्पीय सहाय्य 2,52,200 कोटी रुपये इतके आहे. त्यापैकी 192446 कोटी रुपये यापूर्वीच खर्च झाले आहेत.
देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात किफायतशीर दरात दररोज सरासरी ‘2.3 कोटी भारतीयांची’ वाहतूक करणाऱ्या भारतीय रेल्वेला जागतिक दर्जाची संस्था बनवणे, हे सरकारचे प्राधान्य आहे.
विकासाच्या या मार्गावर पुढे जात, येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे करदात्यांचा पैसा भांडवली खर्चात गुंतवत आहे. अशा प्रकारे विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत भारतीय रेल्वेला “फ्यूचर रेडी” बनवण्यासाठी योगदान देत आहे.