पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात रंगला परिसंवाद
पुणे : आपल्या जगण्यातील प्रत्येक क्षेत्रात ए.आय.चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रवेश झाला आहे. साहित्याक्षेत्रातही ए.आय.चा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे; पण तो मर्यादित कारणांसाठीच होतो आहे. जोपर्यंत अभिजात साहित्याची निर्मिती होत आहे आणि ए.आय.च्या क्षेत्रात भाव-भावनांचा प्रवेश होत नाही तोपर्यंत ए.आय.चा धोका साहित्य क्षेत्राला नाही. ए.आय.च्या अतिवापराने मानवाने उपजत बुद्धिमत्तेचा वापर कमी केला तर मात्र तो नैतिकता आणि अध्यात्मापासून दूर जाईल. साहित्यक्षेत्रात नैतिकता आणि आध्यात्मिकता याचे मोल खूप आहे, असा सूर परिसंवादात उमटला.
पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात ए.आय.चा साहित्यावर परिणाम होईल का? या विषयावर रविवारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर, ए.आय. तज्ज्ञ कुलदीप देशपांडे, महिती तंत्रज्ञान व ए.आय. तज्ज्ञ महेश बोंद्रे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता, संगणक तंत्रज्ञ डॉ. आदित्य अभ्यंकर याचा सहभाग होता. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक दीपक शिकारपूर परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दीपक शिकारपूर म्हणाले, साहित्य क्षेत्रात ए.आय.चा वापर जरूर करावा पण या तंत्रज्ञानाचा अतिवापर घातक ठरू शकतो. जो पर्यंत भावभावनांची मदत घेऊन ए.आय. तंत्र विकसित केले जात नाही तो पर्यंत साहित्य क्षेत्राला ए. आय. पासून धोका नाही.
कुलदीप देशपांडे म्हणाले, साहित्य क्षेत्रात सध्यातरी भाषांतरीत साहित्य, लघुकथा, प्रहसने आणि एखाद्या मूळ कादंबरीचा पुढील भाग या क्षेत्रात वापर होत आहे. साहित्याचा वापर आपण फक्त मनोरंजानासाठी करणार का? याचा वाचकाने विचार करणे आवश्यक आहे.
महेश बोंद्रे म्हणाले, आज तरी ए.आय.च्या क्षेत्रात कृत्रिमता आहे; परंतु या क्षेत्रात जसजशी क्रांती घडेल तसतसा साहित्य क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होईल. वाचकाचे स्वयंभू अनुभव याला साहित्य निर्मितीत खूप महत्त्व आहे. शब्दांकन करतानाही ए.आय.च्या माध्यमातून भावनेचा वापर होणे शक्य नाही. खरा लेखक कधीच ए.आय.च्या कुबड्यांचा वापर करणार नाही. कुठल्याही क्षेत्रात ए.आय.वापराची सवय लागू देऊ नका.
साहित्य क्षेत्र हे भावना प्रेरित गोष्टींनी भरलेले असल्याने या क्षेत्रात अजूनही या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला नाही. परंतु येत्या दहा वर्षांत साहित्यनिर्मिती क्षेत्रात ए.आय.चा वापर वाढीस लागू शकतो. नैसर्गिक सृजनशीलतेला पर्याय नाही. साहित्य आणि वाङ्मय यातील फरक समजणे आवश्यक आहे. उत्तम मदतनीस म्हणून ए.आय.चा वापर जरूर होऊ शकतो; पण आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत की तंत्रज्ञान आपला वापर करत आहे याची जाणिव ठेवणे आवश्यक आहे, असे मत डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
प्रदीप निफाडकर म्हणाले, अभिजात साहित्य परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या साहित्यिकांचीच आहे. आज साहित्य क्षेत्रात ए.आय. म्हणजे कागदी फूल आहे. या क्षेत्रात जोपर्यंत भावभावनांचा शिरकाव होत नाही तोपर्यंत साहित्यक्षेत्राला ए.आय.चा धोका नाही. ए.आय.कडे वाईट नजरेने पहायला नको कारण साहित्यिकांना त्याच्या माध्यमातून आपल्या साहित्यकृती सहजतेने इतर भाषांत रूपांतरित करता येतील. नव साहित्यिकांनी ए.आय.चा वापर डोळसपणे करावा.