बारामती-धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन एकीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे राहुल गांधी यांचेही अदानींविरोधात मत काही वेगळंच असल्याचे दिसत आहे.असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानले आणि त्यांचे कौतुकही केले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विभागातील रोबोटिक लॅबच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदांनींचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला फिनोलेक्स जे पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष दीपक छाब्रिया देखील उपस्थित होते.
शरद पवार नेमके काय म्हणाले …
भारतातले पहिलेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उभारणी आपण करत आहोत, त्याचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाला पंचवीस कोटी रुपये लागणार आहेत, या पंचवीस कोटींची उभारणी करून आम्ही या कामात उडी टाकली आहे. सुदैवाने आमच्या दोन सहकाऱ्यांना यासाठी मदत करण्याची विनंती मी केल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला होकार दिला. सिफोटेक ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील देशातील अत्यंत महत्वाची कंपनी आहे त्यांनी दहा कोटी रुपयांची मदत यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. या प्रकल्पासाठी आणखी एका सहकार्याने मदत करण्याचा निर्णय घेतला व रक्कमही पाठवली त्यामध्ये गौतम अडाणी यांचे नाव या ठिकाणी घ्यावे लागेल. त्यांनी पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे, या दोघांच्या मदतीने हे दोन्ही प्रकल्प आज आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत व प्रत्यक्ष त्याचे कामही सुरू झालेले आहे. मी सांगितले होते की IBN या संस्थेची आम्ही मदत घेत आहोत, या ठिकाणी प्रशिक्षण चालू करा अशी विनंती आम्ही त्यांना केली. मला आनंद या ठिकाणी आहे की IBN चा प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण सुरू केले त्यात १२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यातून प्रशिक्षित झाल्यानंतर नोकरीची एक प्रकारची खात्री त्या कंपनीने दिलेली आहे, तेही काम आपण या ठिकाणी सुरू करत आहोत…….
तेव्हाही अदानीना दिला होता पाठींबा ..
दरम्यान, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षांनी याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळीही शरद पवारांनी अदानींना पाठिंबा दिला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून अदानींना जोरदार विरोध झाला होता.महाविकास आघाडीतील शिवसेना गटानेही नुकताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत गौतम अदानी यांच्याविरोधात निषेध मोर्चा काढला होता. इंडिया अलायन्सचे अनेक नेते केंद्र सरकारवर निशाणा साधत अदानींवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे खासदार शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

