पुणे दि. ०३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या ४१ व्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये राज्यातील महिलांची कार्यशाळा महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक महिला संघटनेच्या प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ४ थे महिला धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधींचे चार गट स्थापन करणार असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन IAS अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांनी केले. तसेच, बैठकीमध्ये श्रीमती मिनी बेदी डेव्हलपमेंट सपोर्ट टीम, श्री. शिरीष फडतरे उपाध्यक्ष मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर, श्रीमती सुधा कोठारी चैतन्य संस्था, श्रीमती वसुधा सरदार कार्यकारी विश्वस्त नवनिर्माण न्यास यांनी आपले विचार मांडले.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या बैठकीमध्ये असे सांगितले की, “महिला धोरणाची अमंलबजावणी योग्यप्रकारे होणे आवश्यक आहे. तसेच यामधील विविध टप्प्यांवर शासन व सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करावे. तसेच, चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये शासन गंभीर आहे. जिल्ह्यामध्ये विकासाच्या अनुषंगाने जिल्हा विकास समिती असते तशी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा महिला विकास समिती स्थापन कराण्यासाठी प्रयत्न करणार. या समितीमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी व नियुक्त केलेल्या महिला प्रतिनिधी असतील व प्रत्येक तीन महिन्यातून एकदा या समितीची बैठक व्हावी व महिलांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती करण्याबाबत प्रयत्न केले जातील.”
श्रीमती मिनी बेदी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शहरी भागामध्ये महिलांचे बचत गट स्थापन करण्यासाठी येत असलेल्या अडचणी बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, पुणे शहरातील महिला बचत गट यांची सविस्तर प्रशासकीय व आर्थिक माहिती वेबसाईटद्वारे सार्वजनिक केलेली आहे. यामध्ये या महिला बचत गटांची सर्व माहिती बँकांनाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असे सांगितले. श्री. शिरीष फडतरे यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षण व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये त्यांनी राज्यातील ३५०० शाळा व कॉलेजेस यांच्या फी ठरवण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली. पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना त्यांनी राबवलेली सुंदर माझी शाळा या उपक्रमाबाबत सांगितले. तसेच, सर्व महिलांनी चांगले शिक्षण घ्यावे व आपण करत असलेल्या चांगल्या कामाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करावा यावर जोर दिला. महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर, श्रीमती सुधा कोठारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ग्रामीण स्तरावरती ग्रामपंचायत विकास समिती स्थापन करावी. तसेच, महिला धोरणाचे अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने या समितीमध्ये सविस्तर निर्णय घेण्यात यावेत. या समितीमार्फत चांगली कामे होऊ शकतात हा विश्वास महिलांमध्ये जागृत करणे आवश्यक आहे.
श्रीमती वसुधाताई सरदार कार्यकारी विश्वस्त नवनिर्माण न्यास यांनी आपल्या मनोगतामध्ये स्त्रियांचे आरोग्य व दर्जेदार आहार मिळावा याबाबत सविस्तर विवेचन केले. अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करत असताना अन्नधान्याचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. रासायनिक खतांच्या वापरामुळे नागरिकांच्या शरीरातील अनेक संस्था अकार्यक्षम होत आहेत यावरती त्यांनी भर दिला. महिलांच्या घरगुती कामाचेही आर्थिक मूल्यमापन व्हावे असा विचार त्यांनी यावेळी मांडला.
श्रीमती रसिका चिट्ठी गुप्ता यांनी त्या करत असलेल्या एकल महिला व कातकरी समाजाच्या महिलांच्या प्रश्नांबाबत आपले विचार मांडले. तसेच या महिलांकडे कोणतीही शासकीय कागदपत्रे नाहीत व त्यांना शासकीय कार्यालयापर्यंत जाण्यामध्ये येणाऱ्या अडचणीबाबतचा मुद्दा मांडून लक्ष वेधले. श्रीमती गायत्री पाठक यांनी बालगृहातून बाहेर पडलेल्या मुले व मुलींच्याबाबतचे प्रश्न सविस्तरपणे मांडले.
यावर पुढे बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “अनाथ बालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कमिटी स्थापित केली जाईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचे सहकार्य लाभेल असा मला विश्वास आहे.”
यावेळी बारामती, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील अनेक महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेतील प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली होती.