या उपक्रमाद्वारे तीन राज्यांतील १०,००० पेक्षा जास्त शालेय मुलांमध्ये तपासणी, माहिती, उपचार व प्रतिबंधात्मक थेरपीचा प्रसार केला जाणार आहे. हिमाचल प्रदेशात या उपक्रमाची प्राथमिक टप्प्यात यशस्वी अमलबजावणी केल्यानंतर संपूर्ण देशभरात उपक्रमाची व्याप्ती वाढवणार
पुणे, २५ नोव्हेंबर २०२४ – जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ही प्रसिद्ध जागतिक आरोग्य संशोधन व तज्ज्ञ संस्था भारतीय भागीदारांसह टीबी- मुक्त शाळा हा उपक्रम लाँच करत आहे. भारतातील क्षयरोगाच्या समस्येला आळा घालण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. जॉन हॉपकिन्स गुप्ता- क्लिन्स्की इंडिया इन्स्टिट्यूटतर्फे (जीकेआयआय) या तीन वर्षाच्या उपक्रमासाठी ३ दशलक्ष डॉलर्स निधी दिला जाणार आहे.
भारतात दरवर्षी १५ वर्षाखालील अंदाजे ३४०,००० मुलांना क्षयरोगाची लागण होत असते. क्षयरोगाच्या एकूण रूग्णांमध्ये मुलांचे प्रमाण १३ टक्के असले, तरी केवळ ६ टक्के मुलांचे निदान होते व त्यांच्यावर उपचार केले जातात. इतरांमध्ये मिसळताना, शाळेसारख्या ठिकाणी क्षयरोगाचा प्रसार होतो असे बदलत्या वैज्ञानिक शोधातून दिसून आले आहे. हॉपकिन्सच्या जीकेआयआयमधील तज्ज्ञांच्या मते किशोरवयातील आणि लहान मुलांमधील क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असून त्यामुळे आजाराचे व लागण होण्याचे प्रमाण कमी करणे शक्य होईल.
भारतातील आघाडीच्या शैक्षणिक वैद्यकीय संशोधन संस्था आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने जगभरातील क्षयरोगाचा प्रतिबंध आणि उपचारांत लक्षणीय बदलांची यापूर्वीच दखल घेतली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथील सेंटर फॉर ट्युबरक्युलॉसिस रिसर्च आणि भागीदार संस्थांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की उदाहरणार्थ क्षयरोग प्रतिबंधक एक महिन्याचा उपचार सुरक्षित आणि नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कोर्सइतकाच प्रभावी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या अभ्यासाचा त्यांच्या क्षयरोग उपचारविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये समावेश केला आहे. आणखी एका संयुक्त इंडिया- जॉन हॉपकिन्स रिसर्च अभ्यासामुळे भारतातील क्षयरोग रूग्णांच्या घरगुती संपर्काच्या चाचणीसाठी आणि प्रतिबंधात्मक थेरपीवर देखरेख करण्यासाठी मदत झाली. या पद्धतीत प्रसार रोखला जातो आणि क्षयरोगाच्या तीव्र केसेस तयार होण्याची शक्यता कमी होते.
टीबी मुक्त शाळा उपक्रम इंडिया- जेएचयू रिसर्च यांच्यात एकत्रितपणे करण्यात आलेल्या अभ्यास अहवालाच्या यशाच्या पायावर रचण्यात आला आहे. त्यामध्ये टीबीविषयी माहिती, तपासणी, उपचार, मोबाइल सर्व्हिस डिलीव्हरी मॉडेल्सद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचल प्रदेशातील तिबेटियन लोकसंख्येसाठी प्रतिबंधात्मक थेरपी यांचा समावेश आहे. या प्रकल्पाने धरमशाला येथील मॉनेस्ट्रीज व शाळांमधील क्षयरोगाचे प्रमाण वाजवी पद्धतीने कमी करण्यात आल्याचे दाखवून दिले आहे. या यशाने प्रेरित होत आणि नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्रॅम व इतर सीएसआर भागिदारांच्या सहकार्याने तीन राज्यांतील चार ठिकाणी या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पुणे व सातारा, उत्तरप्रदेश येथील गोरखपूर आणि तमिळनाडूमधील चेन्नई यांचा समावेश आहे.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता गुप्ता म्हणाल्या, ‘संसर्गजन्य आजार केंद्र क्षयरोगाला चालना देणाऱ्या पद्धती पुराव्यासह शोधण्यासाठी बांधील आहे. क्षयरोग- मुक्त शाळा उपक्रमाने लवकर निदान, उपचार आणि प्रतिबंध यांमुळे लहान मुलांमधील क्षयरोगाचे प्रमाण लक्षणीय पद्धतीने कमी होत असल्याचे दाखवून दिले आहे. हा उपक्रम क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे क्षयरोग मुक्त पिढी उभारण्यासाठी आमच्या एकत्रित प्रयत्नांना बळकटी देणारा आहे.’
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी येथील गुप्ता- क्लिन्सिकीच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष राज गुप्ता म्हणाले, ‘जवळपास शंभर वर्षांपासून जॉन हॉपकिन्सने आधुनिक वैद्यकीय शास्त्र आणि सार्वजनिक आरोग्यासाठी भारतासह ३ दशलक्ष डॉलर्सची आमची बांधिलकी संसर्गजन्य रोगांचे आव्हान सोडवण्याची आणि विशेषतः क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न प्रतिबिंबित करते. क्षयरोगामुळे आपल्या समाजावर अजूनही मोठा ताण तयार झाला आहे. विशिष्ट स्त्रोत आणि एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही पुढील पिढ्यांसाठी अधिक निरोगी, क्षयरोगमुक्त भविष्य तयार करता येईल असा विश्वास आहे.’
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनच्या संचालक नादिया हन्सल म्हणाल्या, ‘जॉन हॉपकिन्समध्ये आम्ही भारतीय सहकाऱ्यांसह एकत्रितपणे काम करण्यासाठी व अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी तसेच भारत आणि जगभरातील आरोग्याची पातळी उंचावण्यासाठी बांधील आहोत.’
पबमॅटिकच्या इंजिनियरिंग विभागाचे सह- संस्थापक आणि अध्यक्ष मुकुल कुमार म्हणाले, ‘पबमॅटिकमध्ये आम्ही कायमच समाजाच्या ऋणांची परतफेड करण्याच्या संधींच्या शोधात असतो. या सहकार्याच्या मदतीने आम्ही भारतातील क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि प्रत्येक मुलाला निरोगी आयुष्य जगण्याची संधी देण्यासाठी उत्सुक आहोत. एकत्रितपणे आम्ही भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल, क्षयरोगमुक्त भविष्य तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने भारतात स्थानिक संस्था व सरकारच्या सहकार्याने संशोधन, प्रशिक्षण उपक्रम राबवत विविध ठिकाणी क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी धोरणे अमलात आणली आहेत. टीबी- मुक्त शाळा उपक्रमामुळे भारत व जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्यातील शतकभर जुने नाते व शिक्षण, वैद्यकीय तसेच अभियांत्रिक संशोधन क्षेत्रातील काम आणखी बळकट झाले आहे.