इंदापूर : इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत विजयाची हॅटट्रिक केली आहे. दत्तात्रय भरणे यांनी 20 हजार 36 मते घेऊन आपली विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील १ लाख ७४ हजार ८३२ पुरुष, १ लाख ६६ हजार ६३१ महिला, इतर २२ असे एकूण ३ लाख ४१ हजार ४३५ एकूण मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३६ हजार १५२ पुरुष, १ लाख २६ हजार ४७२ महिला असे एकूण २ लाख ६२ हजार ६३५ मतदारांनी मताचा अधिकार बजावला होता.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर तात्काळ त्यांची महाविकास आघाडी मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर झाली होती. राज्यामधील महत्त्वाची लढत म्हणून सर्वांचे लक्ष या इंदापूर विधानसभा निवडणुकीकडे लागले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली होती. महाविकास आघाडीमधून प्रवीण दशरथ माने यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवीली होती. शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी इंदापूर तालुक्यामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज असलेल्या बड्या नेत्यांची समजूत काढून मूठ बांधण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी आपला उमेदवार विजयी होण्यासाठी अनेक दुसऱ्या फळीतील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला.या निवडणुकीमध्ये जातीची समीकरणे बांधण्याचा सर्वच नेत्यांच्याकडून प्रयत्न झाला. मराठा, मुस्लिम आणि अनुसूचित जाती जमाती यांची एका बाजूला फळी मजबूत करण्याचा प्रयत्न केला गेला. तर अजित पवारांनी ओबीसी समाज एकत्र केला. त्यामुळे दत्तात्रेय भरणे यांच्याकडे धनगर, माळी असे सूत्र दिसून आले. मागील दहा वर्ष सत्तेपासून वंचित राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांची साथ अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सोडली.
त्यामध्ये कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर आदींसह अनेकांचा समावेश आहे. हर्षवर्धन पाटील यांचे बंधू मयूरसिंह पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची साथ देणे पसंत केले. या प्रमुख कारणांमुळे हर्षवर्धन पाटील यांच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसली आहे.
पहिल्या फेरीत दत्तात्रय भरणे यांना ४ हजार ८६६, तर हर्षवर्धन पाटील यांना ४ हजार ५३० मते मिळाली. अपक्षउमेदवार प्रवीण माने यांनी १ हजार २५० मते घेतली. दत्तात्रय भरणे यांनी ३३६ मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासून दत्तात्रय भरणे यांनी मताची आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या फेरीमध्ये दत्तात्रय भरणे यांची आघाडी 1 हजर 29 मतांची होती. तिसऱ्या फेरीमध्ये कमी होऊन 333 मतांची आघाडी मिळाली होती.
शेवटच्या फेरीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी 1 लाख 16 हजार 748 मते घेतली, तर हर्षवर्धन पाटील 97 हजार 673 मते मिळाली. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी 37 हजार 843 मते घेतली. दत्तात्रेय भरणे यांनी 19 हजार 75 मताधिक्य घेऊन तिसऱ्यांदा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. सलग तीन वेळा हर्षवर्धन पाटील यांना भरणे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले.
मागील निवडणुकीमध्ये १ लाख १० हजार मते हर्षवर्धन पाटील यांना मिळाली होती. या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना एक लाख मते सुद्धा ओलांडता आली नाहीत. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी मतांचे विभाजन केल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना मोठा फटका या निवडणुकीत बसलेला दिसतो.

