भाजपने सर्वाधिक 126 जागांहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपची राज्यातील ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्यामुळे फडणवीस यांचे नेतृत्व अधिकच झळाळून निघाले असून, तेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असतील हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर शनिवारी झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुतीची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने सर्वाधिक 214 जागांवर आघाडी घेतली असून, त्यात भाजपने सर्वाधिक 127, शिवसेना 53 व राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागांवर आघाडी घेतली आहे. तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने 54 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात काँग्रेसने 19, ठाकरे गटाने 21 तर शरद पवार गटाने 14 जागांवर आघाडी घेतली आहे.
महायुतीच्या या दैदिप्यमान विजयाचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिले जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला होता. या निवडणुकीतून धडा घेऊन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारख्या महत्त्वकांक्षी योजना राबवली. त्याचा मोठा लाभ महायुतीला झाला. एवढेच नाही तर भाजपने योग्य उमेदवारांची निवड, जमिनी पातळीवर केलेले काम, स्थानिक पातळीवर साधलेली जातीय समीकरणे व या सर्वांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मिळालेली साथ यामुळे महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यात जम बसवला. पण आता भाजपने स्वबळावर 125 हून अधिक जागांचा आकडा पार केल्यामुळे भाजपचा पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा अधिकच भक्कम झाला आहे.
भाजप नेतृत्वाने ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्याची घोषणा केली. पण आता प्रत्यक्ष निवडणूक निकालात मिळालेल्या प्रचंड यशामुळे मुख्यमंत्रीपदी भाजपचाच नेता बसेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची चर्चा सुरू होती. त्यातच लोकसभा निवडणुकीतील भाजपची हाराकिरी व मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ही शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली होती.
पण विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अधिकच झळाळून निघाले आहे. विशेष म्हणजे भाजप नेतृत्वानेही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाला पसंती दर्शवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळोवेळी त्यांचे नाव घेतले होते. यामुळेही फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील असे मानले जात आहे.