शरद पवारांकडून प्रशांत जगताप यांच्या निष्ठेचे कौतुक
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हडपसर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांची ‘फुटीर’ अशी संभावना करत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या निष्ठेचे कौतुक केले आहे. मतदानाचा दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना पवार यांनी तुपे यांना स्व. विठ्ठलराव तुपे यांच्या निष्ठेची जाणीव करून दिली आहे.
पवार यांनी सोमवारी एक्स या समाजमाध्यमावर हडपसर मतदारसंघातील घडामोडींवर भाष्य करीत एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, “प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष सोडला नाही. चेतन तुपेंनी मात्र फुटिरांना साथ दिली. वडील विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते?’ हे त्यांनी शिकायला हवे होते.”
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष यांच्यात ‘निष्ठा विरूद्ध गद्दारी’ असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांच्या गटाची गद्दार म्हणून होत असलेली संभावना एकीकडे या गटाच्या उमेदवारांना घायाळ करत असल्याचे आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांबाबत सहानुभूती निर्माण करत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी सोमवारी प्रशांत जगताप यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक करीत पाठ थोपटणारे ट्विट केले आहे. तसेच, व्हिडिओच्या माध्यमातून प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही केले आहे.
‘हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला मतदान करण्यासाठी तुम्हा सर्व सहकाऱ्यांची तयारी झाली असेल. या मतदारसंघात निष्ठेची प्रतिष्ठा ठेवायची असेल, तर महाविकास आघाडीच्या वतीने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर प्रशांत जगताप यांना आम्ही सर्वांनी उमेदवारी दिली आहे. पक्षामध्ये राहून जे काम करतात, त्या निष्ठावंतांचा सन्मान होईल. निष्ठा बाजारात विकतात, असा ज्यांचा समज असेल, तर त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीने धडा शिकवल्यासारखे होईल. त्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये प्रशांत जगताप यांना मोठ्या मतांनी विजयी करा,’ असे आवाहन पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.