पुणे:
नियोजनबद्ध आखणी,पदयात्रा,धारदार मुद्दे आणि प्रचारसभाच्या धडाक्याने वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे जोरात असून प्रचारात घेतलेल्या आघाडीने गतिमान झाले आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, त्यांच्या प्रचारसभांना मिळालेला चांगला प्रतिसाद त्यांना निवडणुकीत आघाडी मिळवूनदेऊ शकणार आहे.काही बड्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पठारे यांना पाठिंबा जाहीर करणे सुरु ठेवले आहे.
पठारे यांच्या प्रचारात बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, आणि संजय राऊत यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीने उत्साह भरला . त्यांच्या सभांमध्ये वडगाव शेरीतील स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजनांची आश्वासने दिली जात आहेत. विशेषतः स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट यावर भर दिल्यामुळे मतदारांमध्ये या मोहिमेचा चांगलाच प्रभाव पडत आहे.
डॉ. विश्वंभर चौधरी (समाजसेवक) आणि अॅड. असीम सरोदे यांनी देखील पठारे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पठारे यांच्या शाश्वत विकासाच्या, सामाजिक न्यायाच्या आणि समावेशक प्रगतीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. याशिवाय तरुण नेते नीलेश लंके यांच्या सोबत प्रचार करताना तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यांच्या सहभागामुळे प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, वडगाव शेरीच्या भौतिक सुविधा आणि टँकरमुक्त मतदारसंघाचे स्वप्न या मुद्द्यांवर चर्चा रंगत आहे. पठारे यांच्या प्रचाराचा भर स्थानिक पातळीवरील पाणीटंचाई, वाहतूक समस्या आणि नागरी सुविधा सुधारणा या मुद्द्यांवर आहे. या प्रचारसभांनी मतदारांच्या मनात बदल घडवून आणला असून, त्यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे. या प्रचारसभांना मिळालेला मोठा प्रतिसाद आणि नामवंत नेत्यांचा पाठिंबा बापूसाहेब पठारे यांना मजबूत उमेदवार म्हणून उभे करत आहे. त्यांच्या ‘जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध नेतृत्व’ या भूमिकेला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.