घरच्या सुनेला न्याय न देऊ शकणारे महिलांचे काय संरक्षण करणार ; पठारेंवर जोरदार टिका
पुणे :
खराडी, चंदननगर भागात टँकरवाल्यांचा धंदा चालवायचा म्हणून म्हणून तुम्हाला जाणिवपुर्वक पाण्यापासून वंचित ठेवले गेले. वडगाव शेरी करांनी आता खुप सहन केले. तुम्ही महायुतीचे उमेदवार सुनिल टिंगरे यांना साथ द्या. टँकरमाफिया वाल्यांना हद्दपार केल्याशिवाय मी पुन्हा मत माघायला येणार नाही असे जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
वडगाव शेरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल टिंगरे यांच्या प्रचारार्थ चंदननगर पवार यांनी जाहिर सभा घेतली. माजी आमदार जगदिश मुळीक यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आमदार टिंगरे यांनी मतदारसंघात केलेल्या ऑक्सीजन पार्क, लोहगाव उपजिल्हा रुग्णालय, शास्त्रीनगर चौक, विश्रांतवाडीतील उड्डाणपूल अशा दिड हजार कोटींच्या विकासकामांची यादीच वाचून दाखविली. महाविकास आघाडीचे उमेदवार बापु पठारे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत पवार म्हणाले, 30 वर्ष सत्ता असून त्यांनी या भागातील पाणी प्रश्न सोडविला नाही. बरोबर पाच वर्षांपुर्वी हे महाशय विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात माझ्याबरोबर आणि संध्याकाळी वर्षांवर जाऊन पोहचले, मग ही गद्दारी नाही का असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, या मैदानावर पाच वर्षांपुर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभेत एका माई-माउलीने उभा राहून न्याय देण्याची मागणी केली होती. जे घरच्या सुनेला न्याय देऊ शकत नाही ते मतदारसंघातील महिलांना काय न्याय देणार अशी टिकाही पवार यांनी केली. तर आमदार टिंगरे यांचा ज्या घटनेशी संबध नाहीत त्यात त्यांना बदनाम करण्याचे काम केले असे सांगत त्यांनी त्यांची पाठराखण केली.
महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणीसह विविध कल्याणीकारी योजना राबविल्या. तुम्ही महायुतीचे सरकार निवडून द्या, पुढच्या पाच वर्ष या योजना सुरूच राहिल याची हमी मी देतो. असे सांगत लोकसभेत संविधान बदलाचा खोटा प्रचार केला गेला. खोटा नेरेटिव्ह पसरविला जात आहे. तुम्ही त्याला बळी पडला, आता तुम्ही नीट विचार करा आणि मतदान करा. आम्ही सर्व अल्पसंख्याकांसह सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले असे सांगत येत्या 20 तारखेला घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून आमदार सुनिल टिंगरे यांना विजयी करा असे आवाहनही पवार यांनी केले.
चाकणकरांनी थेट पुरावेच सादर केले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट महाविकास आघाडीचे उमेदवार पठारे यांच्या विरोधातील दाखल झालेला एफआरआय न. 144 चा पुरावे सभेत सादर केले. तुमच्या विरोधातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत कुठे भेटायचे सांगा असे थेट आवाहन चाकणकर यांनी दिले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी जाणिवपुर्वक महिलांची बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.