पुणे –
क्यूनेट कंपनीच्या माध्यमातून राज्यात साडेनऊ ते दहा लाख लोक आणि देशात सुमारे ५० लाख जणांची गुंतवणुकीच्या माध्यमातून ५० हजार कोटी पेक्षा अधिकची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा प्रयत्न करून आघाडी सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. फडणवीस सरकारने संबंधित कंपनीवर कारवाई सुरू केली होती. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या आघाडी सरकारने या प्रकरणात आरोपींना सहाय्य केले आहे .संबंधित कंपनीचे तीन मुख्य संचालकांपैकी एक संचालक श्रीलंकेत रहिवासी असून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांशी त्याचा संबंध आहे अशा लोकांना आघाडी सरकार पाठबळ का देते याबाबत त्यांनी खुलासा करावा. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी याबाबत राज्यपाल यांच्याकडे मागणी करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, गुरुप्रित सिंग, हेमंत लेले ,पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
भंडारी म्हणाले, आघाडी सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील राहुल चिटणीस यांनी तत्कालीन राज्य सरकारच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक प्रमुख यांना एक मसुदा पाठवला होता. त्यात रिकाम्या जागा ठेऊन सह्या करून मसुदा पाठवण्यास सांगितले. त्यावर २९/२/२०२० रोजी एसआयटी प्रमुख दिलीप देशमुख यांनी दोन पानी उत्तर पाठवले. तुमचे मसुद्याचे पत्र न्यायालयात हजर केले तर ते खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करणे माझ्याकडून घडेल. मी जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरेल त्यामुळे मी सही करणार नाही. त्यावर राज्य सरकारने एसआयटी बरखास्त केली आणि अधिकाऱ्यांची बदली केली, लाखो लोकांची फसवणूक करणाऱ्या एका कंपनीला न्यायालयात संरक्षण देण्याचे काम आघाडी सरकारने केले आणि गुन्हेगार यांना पाठीशी घातले.
डॉ झाकीर नाईक यांना परदेशात पळून जाण्यास मदत ही क्यूनेट कंपनीने केली आहे. चिटणीस हे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण, पालघर साधू हत्याकांड मध्ये आघाडी सरकारकडून बाजू मांडत होते. माविआ मधील सर्व नेत्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी याबाबत खुलासा करावा.
व्होट जिहाद बाबत शरद पवार टीका करतात याबाबत बोलताना भंडारी म्हणाले, खासदार शरद पवार आपण पूर्वी नेमके काय केले हे विसरून जातात. धर्माच्या नावावर मते द्या असे आव्हान त्यांच्या पक्षासाठी केले गेले तर त्याबाबत धार्मिक राजकारण नसते. पण व्होट जिहाद बाबत ते दुटप्पी राजकारण करत आहे. पवार हे सर तन से जुदा होगा याबाबत कधी स्वतःची भूमिका मांडत नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील पवार यांच्या सोबत राहून त्यांच्या सारखे बोलायला लागले आहे.