पुणे:
रिक्षा हा पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. रिक्षाचालकांना एकेरी हाक न मारता अहो, रिक्षावाले काका असे म्हणण्याचे संस्कार आणि संस्कृती स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी निर्माण करून या व्यावसायिकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानुसार रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची भावना कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली.
दत्तवाडी, साने गुरुजी नगर परिसरात रासने यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. धीरज घाटे, धनंजय जाधव, प्रशांत सुर्वे, विजय गायकवाड, दीपक पोटे, तानाजी ताकपिरे, चंद्रकांत पोटे, अश्विनीताई पवार, शैलेश लडकत, सुनिता जंगम, केदार मानकर, विशाल पवार, आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रासने म्हणाले, महायुती सरकारने राज्यातील रिक्षाचालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या नावाने महामंडळ स्थापन केले. या मंडळाअंतर्गत प्रत्येक रिक्षाचालकाला जीवन विमा कवच आणि मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. अपघातात कोणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये केली जाईल. रिक्षाचालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तर उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यांच्या मुलांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल करण्यात येणार आहे. तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. या सर्व योजना कसबा विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
रासने पुढे म्हणाले, रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती बेताची असते. कृतज्ञतेच्या भावनेने मध्य वस्तीतील 1200 रिक्षाचालकांना गणवेश वितरित करण्यात आले. रिक्षाचालकांसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाही मोठ्या संख्येने रिक्षाचालकांनी लाभ घेतला. रिक्षाचालकांना सक्तीचा केलेला दररोजचा 50 रुपयांचा वाहन योग्यता प्रमाणपत्र दंड रद्द करावा यासाठी आग्रही राहीन. रिक्षा ॲपसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून, मेट्रोला पूरक नव्याने शेअर रिक्षा धोरण राबविणार आहे. शहरातील प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून रिक्षांना सीएनजी किटसाठी प्रत्येकी 12 हजार रुपयांचे अनुदान मिळवून दिले. शहराची वाढती हद्द आणि लोकसंख्या लक्षात घेऊन रिक्षा स्टँडची संख्या वाढविण्यावर भर देणार आहे.