एकमेकांवरील विश्वास ढळू देऊ नका – डॉ गोऱ्हे यांचे आवाहन
मुंबई दि.१५: आजच्या बदललेल्या जगात घर, पाणी वीज सर्व काही मिळेल पण विश्वास मिळणार नाही. आपण सर्वांनी तो विश्वास भारत वाघमारे यांच्यावर दाखविला आणि आतापर्यंत जी वाटचाल केलेली आहे त्याबद्दल प्रत्येकाचे अभिनंदन केले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत वाघमारे यांना चर्चेद्वारे येथील समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यातूनच येथील घरांचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
चेंबूर येथील एस. आर. ए. हक्क परिषदेला डॉ गोऱ्हे यांनी आज मार्गदर्शन केले. याप्रसंगी, मुख्यप्रवर्तक भारत वाघमारे, समृद्धी काते, ऍड. अभिजित रंजन, प्रकाश थोरवडे, गोरखनाथ कांबळे, अविनाश वाघमारे, संजय कांबळे, राजू आठवले, प्रकाश कोटी व इतर मान्यवर उपस्थित होते.
चेंबूर येथील सिद्धार्थनगरमधील एस.आर.ए. योजनेमधील घरे उभी करताना येथील लोकांना अक्षरशः वेठीस धरले गेले आहे, याकडे लक्ष वेधतांना, या गोरगरिबांच्या हक्कांच्या घरासाठी अनेकदा आपण लढा दिला असून यामध्ये पुण्यासह इतर ठिकाणी देखील गोरगरीब लोकांच्या भूखंडावर डल्ला मारणाऱ्या विकासकांवर आयुष्यभर तुरुंगात राहण्याची वेळ आलेली आहे, याची आठवण डॉ गोऱ्हे यांनी यावेळी करुन दिली.
या लढ्यामध्ये कायद्याचे आणि नियमांचे संरक्षण आपल्याला आहे, असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, पूर्वी ब्रिटिश काळात एखादी वस्तू आंदण म्हणून दिली जायची, सिद्धार्थ नगर कॉलनी देखील आंदण दिल्याप्रमाणे येथे राजेशाही नाही तर गुंडशाही सुरू आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावनाही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
येथील नागरिकांनी विकासकाच्या दबावाला बळी न पडता एकमेकावरील विश्वास कायम ठेवावा, असे अवाहन डॉ गोऱ्हे यांनी केले. या योजनेत होत असलेल्या गैरप्रकाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, हे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून देत येथील नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, अशी ग्वाही डॉ गोऱ्हे यांनी दिली.
येत्या २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदान करावे आणि राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आणावे, असे आवाहनही शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रसंगी केले.