कसब्यातील मतदार पोटनिवडणुकीतील
निकालच कायम ठेवतील
पुणे:रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतून क्रांतीची मशाल पेटवली. या पोटनिवडणुकीत कसब्यातील नागरिकांनी जो निकाल दिला, त्यानंतरच हा मतदारसंघ ठळकपणे महाराष्ट्राच्या नकाशावर आला. येथील मतदार याही निवडणुकीत हाच निर्णय कायम ठेवतील आणि धंगेकर यांना विजयी करतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
लोकमान्य सभागृह केसरी वाडा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. ते म्हणाले की कसब्यातील शिवसैनिक जोरात आहेत. ते धंगेकर यांना समर्थपणे साथ देतील. महाराष्ट्राच्या सत्तेवरची घाण उखडून फेकण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मदतीचा हात देऊन पुण्यात यश मिळवलेच पाहिजे. त्याखेरीज पुण्यात निर्माण झालेली ही कोयता गॅंग उध्वस्त करता येणार नाही. एकेकाळी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आज कोयता गॅंगचे शहर, भ्रष्टाचाराचे शहर अशी झाली आहे. त्याला सध्याचे सत्ताधारीच जबाबदार आहेत. सध्याच्या सत्ताधाऱ्यांची पैशाची भूक भागलेली नाही. जे आमदार आणि खासदार विकले गेले ते मोदी-शहांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. त्यांनी मुंबई संपवली, आता ते पुणे संपवायला निघाले आहेत. या राज्यात जर पुन्हा फडणवीस यांची सत्ता आली, तर ते पहिला विदर्भ वेगळा करतील, त्यानंतर मुंबई तोडली जाईल, त्यांचे हे महाराष्ट्र तोडण्याचे षडयंत्र बरेच दिवस शिजते आहे. जोपर्यंत एकसंध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत महाराष्ट्र तोडता येणार नाही, अशी खात्री पटल्यामुळेच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. गुजरातचे लोक हे व्यापारी वृत्तीने राज्य करतात त्यांनी देशभर लूट चालवली आहे. त्यांनी आता पैशाची मस्ती दाखवायला सुरुवात केली आहे, ही पैशाची मस्ती आपण खपवून घ्यायची नाही आणि एकजूट कायम राखून या महाराष्ट्रविरोधी शक्तींना सत्तेवरून खाली खेचायचे असा निर्धार आपण केला पाहिजे असे आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की आपण मोठ्या मताधिक्याने विजय होवू.
या कार्यकर्ता मेळाव्याला अंकुश काकडे, संजय मोरे, गजानन थरकुडे, मोहन जोशी, रोहित टिळक, बाळासाहेब अमराळे, नीता परदेशी, गणेश नलावडे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊत आणि रवींद्र धंगेकर यांना समर्थन दिले.
दरम्यान, आज चातुर्मास परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने आमदार रवींद्र धंगेकर यांनी दादावाडी जैन श्वेतांबर मंदिर येथे साकारण्यात आलेल्या शत्रुंजय गिरीराज पर्वत म्हणजेच शत्रुंजयपटाचे दर्शन घेतले. या दिनानिमित्त जैन साधू एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी विहार करतात, त्यामुळे जैन समाजात या दिवसाला खूप महत्त्व असते. यावेळी रमेश बोराणा, कांतीलाल पार्लेचा, सुरेश जैन, शांतीलाल जैन, संपत जैन आदी उपस्थित होते. उपस्थित जैन बांधवांनी यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या.