पुणे : रेशन कार्ड पूर्ववत करणेसाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील असे सांगून 2800 रुपये लाच स्वीकारताना एका खाजगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शंकर शिवाजी क्षिरसागर (वय 32 रा. पुणे) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुणे एसीबीने ही कारवाई सोमवारी (दि.18) जुनी जिल्हा परिषदेसमोरील फुटपाथवर केली.याबाबत 67 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात 5 डिसेंबर रोजी तक्रार दिली आहे. तक्रारदार हे त्यांच्या नावावर असलेली शिधापत्रिका पूर्ववत करणेसाठी व अन्न धान्य पुरवठा चालू करणेकरिता जुनी जिल्हा परिषद कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांना भेटले होते. त्यावेळी कार्यालयात असलेला खासगी इसम शंकर क्षीरसागर याने तकरारदार यांना साहेबांचे काम मी करतो व तुमचे रेशनकार्ड काढून देतो असे सांगितले. यासाठी क्षिरसागर याने तक्रारदार यांचेकडे सुरवातीला 4 हजार 500 रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली.
एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता शंकर क्षिरसागर याने तक्रारदार यांचे शिधापत्रिकेचे काम करून देण्यासाठी
साहेबांना पैसे द्यावे लागतील असे सांगून साडेचार हजार रुपये लाच मागून तडजोड़ी अंती 2 हजार 800 रुपये
लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या जिल्हा परिषदेसमोरील फुटपाथवर सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना शंकर क्षिरसागर याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव ,पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर , महिला पोलीस नाईक वनिता गोरे,पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, चालक कदम यांच्या पथकाने केली.

