पुणे1: निवडणुकीत आदर्श आचारसंहिता कालावधी पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, समाज माध्यमांवरील प्रचार आदी बाबी गांभीर्याने घ्याव्यात; कार्यवाही करताना आपल्या यापूर्वीच्या निवडणुकीतील पूर्वानुभव व त्यामाध्यमातून नाविन्यपूर्ण कल्पना राबवून त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे निर्देश विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन दिले.
जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाविषयक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, ए. वेंकादेश बाबू, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त पियुषकुमार सिंह यादव, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विक्रम चंद मेका, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक खर्च सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
श्री. बालकृष्णन म्हणाले, निवडणुकीच्या काळात दारु निर्मिती करणाऱ्या कंपनीला अतिरिक्त उत्पादनाकरीता परवाना देण्यात येवू नये. उत्पादन नेणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा असावी, वाहने थांब्याच्या ठिकाणी फिरती सर्वेक्षण पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), पोलीस पथकाद्वारे तपासणी करावी. खर्च संवेदनशील मतदार संघांमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त भरारी पथक (एफएसटी), व स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे (एसएसटी) कसून तपासणी सुरू ठेवावी. उमेदवारांच्यावतीने काढण्यात येणाऱ्या रॅलीच्या मार्गावरील संशयास्पद ठिकाणांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी.
निवडणुकीच्या काळात अवैधरित्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर विविध पथकांच्या माध्यमातून कडक लक्ष ठेवण्यात यावे. कारवाई करतांना बॅंक व एटीएम व्यवहार, रोख व्यवहार, मोबाईलवरील संदेश, सीसीटिव्ही आदी पुराव्याची तपासणी करावी. स्थानिक बॅंकेच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात यावे.
रेल्वेने अवैधरित्या होणारी पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातूंची वाहतूक रोखण्याकरीता रेल्वे पोलीसांनी राज्य उत्पादन शुलक्, स्थानिक पोलीसांच्या मदतीने कार्यवाही करावी. विमानतळावरही यादृष्टीने कार्यवाही करावी. जिल्हा नियत्रंण कक्षात येणाऱ्या तक्रारी दैनंदिन निकाली काढावेत. निवडणुकीचे कामकाजाकरीता आवश्यकतेनुसार मनुष्यबळ आणि वाहने पुरविण्यात यावीत. निवडणुकीची गांभीर्यता लक्षात घेवून सर्व संबंधित यंत्रणेने संपर्कात राहून निवडणूक कामकाज पार पाडावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
डॉ. दिवसे यांनी एफएसटी, एसएसटी, व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) पथकांच्या मदतीने निवडणुकीतील पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू यांची जप्ती यासाठीची यंत्रणा, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, निवडणुकीसाठी केलेल्या व्हीएचए, सी- व्हिजिल आदीबाबत निरीक्षकांना माहिती दिली. बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. दिवसे म्हणाले.
यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, ए. वेंकादेश बाबू यांनी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च तसेच आयकर विभाग, केंद्रीय व राज्य वस्तुकर विभाग, भारतीय रेल्वे, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागाच्यावतीने खर्चाबाबत करण्यात आलेली कारवाई व नियोजनाबाबत माहिती दिली.