निवडणुकीच्यावेळी देशाप्रती आपले योगदान डोळ्यासमोर ठेवून समर्पण भावनेने कामे करा- दीपक मिश्रा
पुणे, दि 11: निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याची आपली जबाबदारी असून देशाप्रती आपले योगदान डोळ्यासमोर ठेवून समर्पण भावनेने कामे करावीत, असे निर्देश विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून राज्यासाठी नियुक्त विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा यांनी दिले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील कायदा व सुववस्थेबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, निवडणूक पोलीस निरीक्षक राजेश सिंह, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होते.
श्री. मिश्रा म्हणाले, पुणे विभागात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याबाबत नियोजन करावे. समाजात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याबाबत दक्ष राहावे. सुरक्षिततेच्यादृष्टीने कायदा व सुवस्थेबाबत जिल्हानिहाय सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे. मतदानाच्या एक दिवस आधी (19 नोव्हेंबर) सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेवून मॉक ड्रील घेण्यात यावे, असेही ते म्हणाले.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ईव्हीएम यंत्र सुरक्षितेच्यादृष्टीने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत स्ट्रॉंग रुममध्ये पोहचतील याबाबत दक्षता घ्यावी. संवेदनशील मतदान केंद्रावर इतर नागरिकांची गर्दी होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. आवश्यकतेप्रमाणे मतदान केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदाना सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, सोलापूरचे अतुल कुलकर्णी, कोल्हापूरचे महेंद्र पंडित, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रारंभी विभागातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा सादर केला.