संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान पर्यंत आयोजन
पुणे ः भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र राज्य, पालखी सोहळा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, श्री नामदेव दरबार कमेटी श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) पर्यंत सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल वारीला मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्री क्षेत्र पंढरपूरहून सुरूवात होणार असून सोलापूर, सातारा, निरा, जेजुरू, सासवड, हडपसर मार्गे बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके यांनी दिली.
संत नामदेव महाराज यांनी १२ व्या शतकात उत्तर भारतात जावून विठ्ठल भक्तीचा व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे. विठ्ठल भक्तीचा व शांती, समता व बंधूता हा भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी ही सायकल वारी काढली जाते. सायकल वारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे. बुधवार दिनांक. १३ रोजी हडपसर येथील संत नामदेव मंदिरातून सायंकाळी ६.०० वाजता सायकल वारीचे प्रस्थान होणार असून वारी काळेपडळ नामदेव मंदिर – तुकाई टेकडी – हडपसर गाडीतळ – भैरोबा नाला – कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून – एमजी रस्ता- श्रीराम मंदिरात – लक्ष्मी रस्ता – सोन्या मारूती चौक – श्री नामदेव मंदिर, बुधवार पेठ येथे मुक्कामी असणार आहे. गुरूवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता डेक्कन, फर्ग्युसन रोड, संगमवाडी, विश्रांतवाडी मार्गे आळंदीकडे प्रस्थान करणार आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे खजिनदार मनोज मांढरे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डाॅ. अजय फुटाणे, मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, विश्वस्त वसंतराव खुर्द, पुणे विभागीय उपाध्यक्ष रणजित माळवदे, पुणे जिल्हाध्यक्ष विजय कालेकर यांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या सायकल वारीमध्ये श्री संत नामदेव महाराज यांचा रथ, ४ गाड्या, १०० सायकल चालक, ३० वारकरी भजनी मंडळ, १० सेवेकरी, वाहन चालक आणि व्यवस्थापक यांच्या समावेश असणार आहे. महाराष्ट्र, गुजरात , राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्यातुन प्रवास करीत ही सायकल वारी बुधवार दिनांक ४ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान येथे पोहचणार असल्याची माहिती नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी दिली.