मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती
‘ब्रह्मचित्कला मुक्ताई’ कार्यक्रमातून उलगडला संत मुक्ताबाईंचा अलौकिक जीवनप्रवास
पुणे : भक्तांप्रती असलेला मातृत्वभाव, भक्तीयोगात प्राप्त केलेले उच्च स्थान, सामान्य जीवांना परब्रह्माचे दर्शन घडविण्याची आध्यात्मिक तयारी असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाईंचा अलौकिक जीवनप्रवास ‘ब्रह्मचित्कला मुक्ताई’ या कार्यक्रमातून उलगडला.
महाराष्ट्राला अनमोल आणि अमोघ अशी संत परंपरा लाभली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच संस्कारमूल्य जपणारी एक तरी पणती आपणही लावावी या उद्देशाने पंडित हेमंत पेंडसे यांनी संत मुक्ताबाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ब्रह्मचित्कला मुक्ताई’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कीर्तनाच्या धाटणीतून आणि अभंगांची जोड देत संत मुक्ताबाई यांचा जीवनपट भावपूर्णतेने पुणेकरांसमोर मांडण्यात आला. पंडित हेमंत पेंडसे, प्रख्यात कीर्तनकार रोहिणी माने-परांजपे यांच्यासह राधिका ताम्हनकर, मेहेर परळीकर यांचा सहभाग होता. अमित वेणू (बासरी), कौस्तुभ परांजपे (ऑर्गन), अजित किंबहुने (तबला), उद्धव गोळे (पखावज), स्वप्नील कुंभार (टाळ) यांनी साथसंगत केली. कार्यक्रम भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेमध्ये भक्तीचा मळा फुलविणाऱ्या संत मुक्ताबाई यांचे बहुमूल्य योगदान आहे. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या आणि भक्तीयोगमार्गात उच्च स्थान प्राप्त केलेल्या संत मुक्ताबाई या अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारे जीवन जगल्या. मानवी मनाचे समुपदेशन करणाऱ्या आदीशक्ती मुक्ताईचे नाव स्त्री संतांच्या मांदियाळीत प्रामुख्याने घेतले जाते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताबाई. ही चारही भावंडे विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तीमंत दीव्य स्वरूप होत. बोलण्यात स्पष्टता आणि कठोरता असणाऱ्या मुक्ताईने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी भावंडांचे आईपण स्वीकारत शिष्यांवर मायेची चादर पांघरली.
संत मुक्ताईची जीवनकथा आपल्या अमोघ वाणीतून रोहिणी माने-परांजपे एकिकडे उलगडत असताना नमो ज्ञानेश्वरा, मुंगी उडाली आकाशी, व्यथा सांगण्यास ज्ञाना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, धन्य धन्य मुक्ताबाई, निर्गुणाचे डहाळी, पाळणा लाविला, गुरू हा संतकुळीचा राजा, टाळ दिंडीचा गजर, बोलतो मृदुंग बोले एकतारी, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, आली गेली कैसी कळले नाही कोठे मुक्ताई या भक्तीरचना भावपूर्णतेने सादर करण्यात आल्या.
संत निळोबाराय, संत मुक्ताई, संत नामदेव, संत सोयराबाई, संत एकनाथ यांच्य रचनांसह डॉ. राहुल देशपांडे यांची भक्तिगीते पंडित हेमंत पेंडसे, राधिका ताम्हनकर, मेहेर परळीकर यांनी सादर केली.
भक्तीमार्गात परकाया प्रवेशसिद्धी मिळविलेल्या, स्त्री-पुरुष भेदापलिकडे जगणे शिकविणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तीरसाने परिपूर्ण जीवनप्रवास ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.