पुणे : दिवाळीच्या प्रकाशपर्वाचे निमित्त साधून प्रसिद्ध संगीतकार, शास्त्रीय गायक पंडित हेमंत पेंडसे यांनी संत मुक्ताबाई यांचे चरित्र उलगडून दाखविणाऱ्या ‘ब्रह्मचित्कला मुक्ताई’ या आगळ्या वेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुभारंभाचा प्रयोग दिवाळी पाडव्याला अर्थात शनिवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेशेजारील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राला अनमोल आणि अमोघ अशी संत परंपरा लाभली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच संस्कारमूल्य जपणारी एक तरी पणती आपणही लावावी या उद्देशाने संत मुक्ताबाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ब्रह्मचित्कला मुक्ताई’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनाच्या धाटणीतून संतांचा जीवनपट उलगडून काही संत रचना तर काही भक्तीगीते या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत, अशी माहिती पंडित हेमंत पेंडसे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पंडित हेमंत पेंडसे आणि ज्यांची ख्याती चौफेर पसरली आहे अशा कीर्तनकार रोहिणी माने-परांजपे प्रमुख सूत्रधार आहेत. पंडित हेमंत पेंडसे यांच्यासह राधिका ताम्हनकर, मेहेर परळीकर रचना सादर करणार आहेत. तर अमित वेणू, कौस्तुभ परांजपे, अजित किंबहुने, उद्धव गोळे हे कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.