नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलेल्या असहकाराच्या भूमिकेची दखल घेऊन काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.संजय राउत यांनी काँग्रेसश्रेष्ठींकडे पटोलेंची तक्रार केली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याबाबत राज्यातील नेत्यांशी चर्चा केली. यावेळीदेखील पतोलेंचा हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी प्रामुख्याने उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी समन्वय साधून मार्ग काढण्याची जबाबदारी आता काँग्रेस कार्यकारी समितीचे (सीडब्ल्यूसी) सदस्य बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज मातोश्रीवर जाणार असून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या राजकीय वादावर ते चर्चा करणार आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र चर्चेत सहभागी होणार नाहीत.
गेल्या शनिवारी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पटोले यांच्याविरोधात भूमिका मांडली होती. पटोले यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. यावर पटोले यांनी प्रत्युत्तरादाखल खासदार राऊत हे उद्धव ठाकरे यांना न विचारता परस्परमत मांडत असल्याचा आरोप केला होता. यावर भडकलेल्या राऊत यांनी आता पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा दिला होता
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उद्या (ता. २२) मातोश्रीवर जाणार असून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या राजकीय वादावर ते चर्चा करणार आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र चर्चेत सहभागी होणार नाहीत.

