आतापर्यंत मिळालेल्या धमक्या १००–पुणे विमानाला तिसऱ्यांदा धमकी-
पुणे -सिंगापूर ते पुणे विमानासह विस्तारा कंपनीच्या एकूण ६ अांतरराष्ट्रीय विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने पुणे विमानतळावर रविवारी सिंगापूर-पुणे विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र विमानात कोणतीही संशयास्पद बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. ६ विमानांमध्ये १२ जण बॉम्बसह बसले आहेत, विमानातील प्रत्येकाचा शेवट होईल, असे या संदेशात म्हटले होते. तसेच त्या सहा विमानांचे क्रमांकही देण्यात आले होते. गेल्या ६ दिवसांत विमानात बाॅम्बची धमकी मिळाल्याची पुण्यातील ही तिसरी घटना आहे. देशभरात एकूण १०० पेक्षा अधिक घटना घडल्या असून याप्रकरणी कडक कायदा करण्याचे केंद्र सरकारने सांगितले. दरम्यान, या महिन्यात विमानात बाॅम्ब ठेवल्याच्या एकापाठोपाठ एक अशा १०० पेक्षा अधिक घटना घडल्यानंतर सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे.
रविवारी दुपारी विस्तारा कंपनीच्या सिंगापूर-पुणे विमानात बाॅम्ब ठेवल्याचा एक संदेश ‘स्किझोफ्रेनिया १११’या सोशल मीडिया साइट ‘एक्स’वरून पुणे पोलिसांना देण्यात आला.त्या संदेशात एकूण विस्तारा कंपनीच्या ६ आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या विमानांचे क्रमांक होते. त्यापैकी यूके ११० क्रमांकाचे विमान सिंगापूर ते पुणे असे होते. हे विमान पुण्यात धावपट्टीवर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पोलिसांचे बाॅम्बशोधक-नाशक पथक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले.
प्रवाशांची त्यांच्याजवळील लगेजची तसेच विमानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात श्वान पथकाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. या तपासणीत बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळली नाही. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. दरम्यान, या तपासणीमुळे विमानसेवा वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नाही, पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले. या धमकी प्रकरणी स्क्रिझोफ्रेनिया १११ या एक्सवरील खात्याच्या युजरविरोधात विमानतळ प्रशासनाकडून मुनीष कोतवाल यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विमानात बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १९८२ च्या हवाई वाहतूक कायदा तसेच विमान सुरक्षा नियमावलीत सुधारणा करुन कडक कायदा करण्यात येणार अाहे. अशा धमक्यांचे कट कारस्थान करणाऱ्यांना विमान प्रवास बंदी ( नो फ्लाय लिस्ट) करण्यात येईल,अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के.राममोहन नायडू यांनी दिली.
हवाई वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक झुल्फिकार हसन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (बीआयएसएफ) चे महासंचालक राजविंदर सिंह यांनी सोमवारी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांची भेट घेऊन त्यांना बॉम्ब धमक्यांच्या घटनांच्या तपासात आतापर्यंतच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. ही या तिन्ही अधिकाऱ्यांनी अर्धातास बंदव्दार चर्चा झाली.
गेल्या आठवडाभरात आतापर्यंत १०० विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. रविवारी ३० विमानांना धमक्यांचे संदेश मिळाले होते तत्पूर्वी शनिवारी ३० विमानांना धमक्या मिळाल्या होत्या. सुदैवाने या सर्व अफवा ठरल्या आहेत.
विमानात बॉम्ब ठेवल्याचे मेसेज येण्याच्या घटना पूर्वी तुरळक प्रमाणात होत्या. मात्र, आता यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करून व्हर्च्युअल आयपी नेटवर्कच्या माध्यमातून संबंधितांचा शोध घेणे तपासी यंत्रणांना अवघड बनते. प्रामुख्याने अशा प्रकारच्या धमक्या या परदेशातून येत असल्याचे दिसून आले आहे. देशाची मजबूत अर्थव्यवस्था आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील आर्थिक भरभराटीवर विपरीत परिणाम करण्यासाठी या घटना वारंवार घडत असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या धमक्या अफवाच असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारचे धोके निर्माण करणाऱ्यांसंदर्भात नवे कायदे बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ते योग्यच आहे.
पुणे विमानाला तिसऱ्यांदा धमकी-१५ आॅक्टोबर : लखनऊहून पुण्याकडे निघालेल्या विमानात बाॅम्ब ठेवला असल्याची धमकी. पुण्यात विमानतळ प्रशासन, पोलिसांनी विमानाची तपासणी केली. तेव्हा बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही.
१९ ऑक्टोबर : पुणे -जोधपूर इंडिगो ६ ई आय ३३ या विमानात बॉम्ब ठेवल्याचा संदेश. जोधपूरमध्ये विमान उतरल्यानंतर तपासणी. अफवा असल्याचे निष्पन्नअज्ञात व्यक्तीने स्किझोफ्रेनिया १११ अकाउंटवरून फ्लाइट यूके २५, फ्लाइट यूके १०६, फ्लाइट १४६,फ्लाइट यूके ११६,फ्लाइट यूके ११० आणि फ्लाइट यूके १०७ या सहा विमानांमध्ये प्रत्येकी २ असे १२ जण बॉम्बसह बसले आहेत. विमानातील प्रत्येक जणाची अखेर धुळीत होईल.
धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सेकंडरी लॅॅडर पॉइंट तपासणी सुरू करण्यात आली आहे. सेकंडरी लॅडर पाइंट तपासणी म्हणजे सीआयएसएफच्या सुरक्षा तपासणीनंतर प्रत्यक्ष विमानात बसण्यापूर्वी विमानतळावरील कर्मचारी पुन्हा प्रवाशांची तपासणी करतात. केंद्रीय विमान सुरक्षा ब्युरोच्या आदेशानुसार ही दुसऱ्या पातळीवरची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे विमानतळावर मॉकड्रीलदेखील घेण्यात येऊन सुरक्षा यंत्रणांची तपासणी करण्यात आली आहे.

