हे सरकार अदानीच्या दारी:50 खोके कमी पडू लागले म्हणून हे बोके आता धारावी अन् मुंबई गिळायला निघालेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्यात आला असून अदानी समूहाकडून या पुनर्विकासाचा कोणताही मास्टर प्लान देण्यात आलेला नाही. त्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महामोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धारावीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी हजारो शिवसैनिकासह धारावीतील लाखो नागरिक देखील यात सहभागी झाले आहेत.
धारावीच्या विकासाला आमचा आजिबात विरोध नाही, पण धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाला 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळावं, बाकी काही कारणं चालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. धारावीकरांना जिथल्या तिथे घर द्या, व्यवसायाला जागा द्या, धारावीतील कोळीवाडा आणि कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
गेली अनेक वर्षे या प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. गरज पडली तर मुंबईच काय तर आख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन. ज्यांनी धारावीची सुपारी घेतलीय त्यांनी समजून घ्यावं हा अडकित्ता आहे, त्यानं ठेचलं तर पुन्हा नाव घेणार नाही असा इशारा त्यांनी भाजपला दिला. जे व्यवसाय गुजरातला गेले ते धारावीत परत आणा, सुरतला नेलेले आर्थिक केंद्र धारावीत झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
यांना खोके कुणी पुरवले?
आता पन्नास खोके कमी पडायला लागलेत त्यामुळे आता धारावी विकायला निघालेत अशी टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा लढा आता केवळ धारावीचा नाही तर महाराष्ट्राचा झाला आहे. अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करून पाडलं, आता सर्वांना समजलं असेल की त्यांना खोके कुणी पुरवले असेल, त्यांची हॉटेल बुकिंग कुणी केलं असेल. जोपर्यंत मी होतो तोपर्यंत यांना काहीच करता आलं नाही. त्यामुळे सरकार पाडलं.
हे देवेंद्र फडणवीसांचे पाप
आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, पण धारावीचा गळा घोटू असा एकही निर्णय घेतला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. 2018 साली धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे हे पाप देवेंद्र फडणवीसांचे आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोनाचे संकट ज्यावेळी आलं होतं त्यावेळी धारावीच्या परिस्थितीवरून देशभर टेन्शन होतं. पण धारावी कोरोनाशी लढली, त्यावेळी आम्ही कुणालाही पात्र आणि अपात्र ठेवलं नाही. पण आता पुनर्विकासाच्या निमित्ताने अनेकांना अपात्र ठरवणार. त्यांना उचलून मिठागराच्या ठिकाणी ठेवणार.
या सरकारमध्ये निवडणूक घेण्याची धमक नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिले, त्यावेळी 105 मराठी माणसांनी रक्त सांडलं. ही आम्ही कमावलेली मुंबई आहे, त्याला हात लावाल तर याद राखा असा इशारा उद्धव ठाकरे म्हणाले.
- खासदार विनायक राऊत म्हणाले की, लाखो लोकांची लुबाडणूक करणाऱ्या अदानी समूहाविरोधात हा मोर्चा आहे. हजारो विकासक या मुंबईत आहेत. त्यांना जाचक अटी लावल्या जातात. पण भाजपच्या चमचेगीरी करणाऱ्या विचारायचे आहे की, अदानींना कोणत्याही अटी का नाहीत. अदानींसाठी किती जीआर काढल्या, प्रत्येक जीआर हा अदानीसाठी होता. मुंबई महापालिका, एमएमआरडी यांना पंधरा दिवसात परवानगी द्यायची आहे. एफएसआय चार पट, विकास शुल्क माफी, जीना प्रीमीयम माफी, वीजविमा जीएसटीला माफ, कुठेही हा टीडीआर वापरला जाईल. अदानीकडून प्रत्येक बिल्डरला टीडीआर घ्यावाच लागेल. ९० टक्के बाजारमूल्याने अन्य विकासकांना टीडीआर घ्यावाच लागेल. झोपडपट्टीचा विकास व्हावा की नाही पण अदानीचा विकास सुरुच होणार आहे.
- धारावीकरांना 400 फूट जागा घरांसाठी देणार आहात का? फडणवीस तुम्ही अदानींची चाकरी करणार आहात का? असा सवाल त्यांनी केला.
‘अदाणींनी मुंबईसाठी काय केले? ‘मोदाणी’ला धारावीचे लचके तोडू देणार नाही’, वर्षा गायकवाड यांची टीका
धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी अदाणी समूह आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. “अदाणींना सर्वच आंदण देण्याचा सपाटा लावला गेला आहे. अदाणींनी विमानतळ घेतले, पोर्ट घेतले, बँका घेतल्या. आता धारावी घेणार का? अदाणींनी मुंबईसाठी काय केले? पण धारावी तुमच्या हाती लागणार नाही. मोदाणींना धारावीचे लचके तोडू देणार नाही. धारावी एकट्याने लढणारी आहे. धारावीसाठी सर्व पक्ष एकत्र येऊन लढतील”, अशी भूमिका आमदार वर्षा गायकवाड यांनी मांडली. मोदी आणि अदाणी यांचे नाव एकत्र करून मोदाणी असे करून काँग्रेस आणि ठाकरे गटाने आपल्या मोर्चाची टॅगलाईन बनविली होती.वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, “काही लोकांना (भाजपा) वाटतं आपल्या मित्राला (अदाणी) मदत केली पाहीजे. म्हणून रोज नवीन नवीन गोष्टी आणल्या जात आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून आज राज्य आणि केंद्र सरकारचे कान आणि डोळे उघडले असतील. जनता काय बोलू इच्छिते हे आजच्या मोर्चातून त्यांना कळले असेल. धारावीचे धारावीपण टिकले पाहीजे. धारावी बीकेसीचे विस्तारीकरण होता कामा नये. धारावीकरांना धारावीतच घर मिळाले पाहीजे.”“धारावी बनविण्याचे काम धारावीतल्या जनतेने केलेले आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन धारवी बनलेली आहे. ज्याला आम्ही मिनी इंडिया म्हणतो. धारावीची ओळखच मुळात बिगेस्ट मायक्रो फायनान्स कॅपिटल म्हणून आहे. लेदर, गारमेंट, रिसायकलींग असे अनेक लघु उद्योग धारावीच्या घराघरात चालतात. धारावीची ओळख केंद्र आणि राज्य सरकारने करून घेतली पाहीजे. आपल्या मित्राला फायदा व्हावा, म्हणून निविदा बदलली गेली आणि ती आपल्या मित्राला म्हणजेच अदाणी यांना देण्यात आली. आम्हालाही धारावीचा विकास हवा आहे, आम्ही विकासाच्या विरोधात नाहीत. पण आमची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी”, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.