पुणे- राज्यात पुण्याची ओळख गुन्ह्याची राजधानी अशी होत चालली आहे. ती फडणवीस यांनी कमी केली तर मीच त्यांना पहिला हार घालेल व ओवाळेलही असे येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे , महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह सेट केले. त्याला हरियानातील जनतेने विधानसभा निवडणुकीत उत्तर दिले असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस थोर आहेत, त्यांनी गृहमंत्री म्हणून राज्यात थोडे तरी लक्ष द्यावे म्हणजे इथला क्राईम रेट कमी होईल अशीही टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सुळे, आणि अमोल कोल्हे तसेच खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दररोज सुरू आहे. बुधवारी झालेल्या मुलाखतींनंतर माध्यमांशी संवाद साधताना बोलताना खासदार सुळे यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. हरियानातील जनतेने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला उत्तर दिले या फडणवीस यांच्या वक्तव्यावर सुळे म्हणाल्या, प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगवेगळे असतात. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली आहे. अर्थखात्यानेच सरकारला आता तुम्ही कोणताही खर्च करू शकत नाही असा अहवाल दिला असल्याची माझी माहिती आहे. राज्यावर ४५ हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे व सरकार ४८ हजार कोटी रूपयांच्या रिगरोडच्या कामाच्या निविदा काढत आहेत. ठेकेदार त्यांची बिले निघत नसल्याने ओरडत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला हे सरकार काय करते आहे याची पूर्ण माहिती आहे.
आमच्या पक्षाकडे वाढता ओघ आहे असा दावा करून सुळे म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असे एकूण १६०० अर्ज आले होते. स्वत: शरद पवार बहुतेकांबरोबर बोलले. त्यांचे आम्हाला सांगणे आहे की फक्त उमेदवारी अर्ज केला त्यांचाच नाही तर त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे. आम्ही काही सर्वांना उमेदवारी देऊ शकणार नाही, पण आमच्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांना संघटनेत, सत्ता आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, सहकारी संस्थांमध्ये सामावून घेऊ. कामाची संधी प्रत्येकाला मिळायला हवी. आमचा विचार राज्यातील जनतेने स्विकारला आहे हेच आमच्याकडे येणाऱ्यांच्या संख्येवरून दिसते आहे.
डॉक्टर, वकिल, प्राध्यापक असा समाजातील बुद्धीवंत वर्ग आमच्या पक्षाकडे येतो आहे असे उमेदवारी अर्जावरून दिसते आहे. त्यातही उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. महिला आरक्षणाचे विधेयक आम्ही संसदेत बहुतमाने मंजूर करून दिला आहे. आता केंद्र सरकारने त्याची पुढील कार्यवाही करावी.- सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)