पुणे- वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सरची धडक बसल्याने रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणीचा येथे मृत्यु झाला. कोथरुड बसस्टँडसमोर आज सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला.आरती सुरेश मनवाने (वय २३, रा. एरंडे होस्टेल, भेलके नगर, कोथरुड) असे या तरुणीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरती मनवाने ही मुळची अमरावतीची राहणारी आहे. कर्वे पुतळा पासून पुढे डहाणूकर कॉलनीपर्यंत कर्वे रोडवर सुतार बसस्टँँड समोरुन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न आरती करत होती. त्याचवेळी डहाणुकर कॉलनीकडून कर्वे पुतळ्याच्या दिशेने एक सिमेंट मिक्सर वेगाने येत होता. त्याची धडक आरतीला बसली. त्यामुळे ती खाली पडून मिक्सरचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यु झाला. मिक्सर चालकाने काही अंतरावर मिक्सर थांबून तेथून पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

