पीएमआरडीएकडून धडक कारवाई \
पुणे / पिंपरी (दि.८) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हवेतील तालुक्यातील लोणीकंद भागातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. संबंधित अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत संबंधितांना काही दिवसांपुर्वी नोटीस दिली होती. पण त्याचे अनुपालन न झाल्याने पीएमआरडीएकडून आता धडक कारवाई होत असून सोमवारी (दि.७) संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात आले.
लोणीकंद (ता. हवेली येथील) येथील स.नं. १६७ मध्ये अनधिकृत बांधकाम करणारे किशोर सुर्यकांत ढमढरे, लक्ष्मण श्रीपती ढमढरे, रफिक इक्बाल शेख, सागर दामोदर धोत्रे, अनिता संजय जोशी ( सर्व रा. लोणीकंद, ता. हवेली) यांचे विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित बांधकामधारकांना पीएमआरडीएने वेळोवेळी अनधिकृत बांधकाम थांबवण्याबाबत नोटीस दिली होती. पण याचे अनुपालन न केल्याने संबंधितांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 54(2) अन्वये लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.
पीएमआरडीए हद्दीतील मालमत्ताधरकांनी परवानगी घेवूनच बांधकामे करत सुरु असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. गुन्हे दाखल करण्याची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, तहसीलदार सचिन मस्के, रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे यांनी केली. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 नुसार अनधिकृत बांधकाम धारकास अनधिकृत बांधकाम थांबविणेची नोटीस दिल्यानंतर सदर बांधकाम न थांबविल्यास तीन वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.