पुणे- कागल येथून समरजितसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतली, त्यानंतर इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला. आता रामराजे निंबाळकर सुद्धा शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटात इनकमिंग सुरू असून अजित पवारांच्या पक्षातून मात्र आउटगोइंग सुरू असल्याचे दिसत आहे. याच सोबत आता अजित पवारांच्या पक्षाला साथ देणाऱ्या मित्र पक्षाने देखील साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवारांना चांगलेच धक्के बसत असताना दिसत आहेत.
अजित पवारांच्या पक्षाला साथ देणारा रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाने साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच आता शरद पवारांच्या सोबत जाणार आहेत. महायुतीमध्ये दलित आणि मुस्लिमांच्या हिताचे रक्षण होत नसल्याने आपण अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सचिन खरात यांनी म्हणले आहे. तसेच शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली असून पुढील निर्णय लवकरच घेणार असल्याचे सचिन खरात यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, यापूर्वी अजित पवारांच्या पक्षातून नेते राजेंद्र शिंगणे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली असून ते देखील आता शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभेचे आमदार आहेत. तसेच फलटणमध्ये देखील अजित पवारांना धक्का बसणार आहे. फलटणचे रामराजे निंबाळकर हे देखील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.