मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत सुशील हरिराम तिवारी वय ३८, या व्यक्तीस १ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आल्याचे राज्य कर उप आयुक्त तपास – जीएसटी भवन, माझगाव, मुंबई, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मे. सेफ क्लाइम्बर या कंपनी विरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून रू.५.७९ कोटींचा चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट वापरून शासनाची महसुल हानी केल्याचे निदर्शनास आले.
महानगर दंडाधिकारी यांनी या आरोपीला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त आणि संजय शेटे, राज्यकर उपायुक्त, अन्वेषण, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब शिंदे व नामदेव मानकर, सहायक राज्यकर आयुक्त, अन्वेषण -अ, मुंबई यांनी राबवली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्वाचे योगदान राहीले आहे.
सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधन महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या अटकेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांस एक प्रकारे इशारा दिलेला आहे.