डॉ. राधिका जोशी आणि अभिषेक काळे यांचे सुरेल सादरीकरण
पुणे : अभिजात संगीत, उपशास्त्रीय रचना, गझल, ठुमरी, भावगीत, चित्रपटगीत, नाट्यसंगीत, अभंग आणि भजन.. असे गायन वैविध्य रसिकांनी अनुभवले. युवा कलाकारांच्या आश्वासक सादरीकरणाने ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
निमित्त होते ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आयोजित ‘सहेला रे आ मिल गाये..’ या मैफलीचे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक आदरांजली अर्पण करण्यासाठी या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, वेद भवन मागे, कोथरूड, येथे कार्यक्रम झाला
मैफलीची सुरुवात डॉ. राधिका जोशी यांनी भूप रागातील किशोरीताईंचीच ‘सहेला रे आ मिल गाये’ या अध्धा त्रितालातील बंदिशीने केली. अगदी मोजक्या अवधीत त्यांनी रागरूप दर्शवून किशोरीताईंच्या या गाजलेल्या बंदिशीची सौंदर्यस्थळे उलगडली. अभिषेक काळे यांनी भीमसेनजींनी निर्मिलेल्या कलाश्री रागातील ‘धन धन भाग सुहाग’ या त्रितालातील बंदिशीचे बहारदार सादरीकरण केले.
डॉ. राधिका जोशी यांनी ‘जाईन विचारित रानफुला’, ‘हम वो गुल है’, ‘म्हारो प्रणाम’, ‘बोलावा विठ्ठल’ अशा विविध रचनांच्या सुरेल गायनातून किशोरीताईंना अभिवादन केले. अभिषेक काळे यांनी ‘मन राम रंगी रंगले’, ‘इंद्रायणी काठी’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘जमुना के तीर’ या रचना ताकदीने सादर करत रसिकांची दाद मिळवली. किशोरीताईंच्या ‘अवघा रंग एक झाला’ या भैरवीमधील भक्तीरचनेने या रंगतदार मैफलीची सांगता झाली.
रसिकांशी संवाद साधताना अभिषेक काळे म्हणाले, संगीतसाधना करत असताना, जे जमत नाही, ज्यासाठी परिश्रम करायचे ते घरी रियाज म्हणून करा आणि जे उत्तम जमते, ते मैफलीत सादर करा, असे पं. भीमसेन जोशी सांगत असत. संगीतसाधक म्हणून मला हे फार महत्त्वाचे वाटते.
डॉ. राधिका जोशी म्हणाल्या, किशोरीताईंना शास्त्रीय संगीताप्रमाणेच संगीताच्या अन्य प्रकारांविषयी आस्था होती. गजल हा संगीतप्रकार त्यांना आवडत असे. उर्दू उच्चार त्यांनी जाणीवपूर्वक शिकून घेतले होते.
या मैफलीसाठी रामकृष्ण करंबेळकर (तबला), मालू गावकर (हार्मोनिअम), प्रथमेश तारळकर (पखवाज), उद्धव कुंभार (साईड ऱ्हिदम) यांनी अनुरूप साथसंगत केली. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी ओघवत्या शैलीत निवेदन केले. ऋत्विक फाऊंडेशनच्या रश्मी वाठारे यांनी आभार मानले.