पीसीसीओईआर मध्ये प्रेरणा महोत्सव
पिंपरी, पुणे (दि. ३० सप्टेंबर २०२४) जिज्ञासूपणा जोपासत नेहमी शिकण्याची तयारी ठेवा. आंतरशाखीय कौशल्ये आत्मसात करीत आव्हानांना खंबीरपणे तोंड द्या. दूरदृष्टी ठेवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे नेटवर्क तयार करावे ही पंचसूत्री पाळून करिअरमध्ये यशस्वी व्हा असे मार्गदर्शन मुंबई आयआयटीचे प्रा. डॉ. संग्राम निर्मळे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पीसीसीओईआर येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सिव्हिल विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे, विद्यार्थी समन्वयक प्रा. अक्षय राहणे, स्पर्धा परीक्षा देऊन पास झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रेयस धर्माधिकारी, संदीप वाघमोडे, अमित मडगे, अश्विनी यलंगफले, गौरव अवघडे, शुभम जेलेवाड, प्रणव पवार आणि त्यांचे पालक उपस्थित होते. या माजी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातील अनुभव व स्पर्धा परीक्षेस सामोरे जाण्यासाठी करावी लागणारी तयारी याबाबत मार्गदर्शन करून प्रेरणा दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच माजी विद्यार्थ्यांना देखील संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा, गेट परीक्षा, उच्च शिक्षण तसेच ड्रोन प्रशिक्षण यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन आणि मार्गदर्शन केले जाते अशी माहिती डॉ. बोबडे यांनी प्रास्ताविक करताना दिली.
प्राचार्य डॉ. तिवारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सिव्हिल विभागाचे कौतुक केले. पीसीईटी आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध प्रकल्पाविषयी माहिती दिली. शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.