पर्यावरणस्नेही १.९५ लाख ग्राहकांना २.३३ कोटींचा फायदा
पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२४: पश्चिम महाराष्ट्रातील पर्यावरणस्नेही १ लाख ९४ हजार ८९८ वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पेपरलेस वीजबिलास राज्यात सर्वाधिक पसंती दिली आहे. यासाठी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ३३ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा फायदा होत आहे.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. त्यानुसार वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ९४ हजार ८९८ पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यातील ४ लाख ८७ हजार ११३ वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४० टक्के ग्राहक पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. तर पुणे परिमंडलातील १ लाख ३० हजार ७६१ ग्राहक राज्यात सर्वाधिक संख्येने या योजनेत सहभागी झाले आहेत.
आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ‘गो-ग्रीन’ योजना पर्यावरण रक्षणासाठी देखील महत्वाची आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ३९ हजार ८२२ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांची १ कोटी ६७ लाख ७८ हजार ६४० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. तर या योजनेतून सातारा जिल्ह्यातील १२ हजार ७९६ ग्राहकांचे १५ लाख ३५ हजार ५२० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १३ हजार ८१९ ग्राहकांचे १६ लाख ५८ हजार २८० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार ५१५ ग्राहकांचे २१ लाख १ हजार ८०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील १० हजार ९४६ ग्राहकांच्या १३ लाख १३ हजार ५२० रुपयांचा वीजबिलामध्ये वार्षिक फायदा होत आहे.
‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळ येथे सुविधा उपलब्ध आहे.