पंडित विश्वनाथ कान्हेरे, अनिरुद्ध गोसावी यांचे संवादिनी वादन
पुणे : भारतातील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध संवादिनी वादक कै. पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर शिष्य परिवार आणि संवादिनी प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर स्मृती संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात युवा संवादिनी वादक अनिरुद्ध गोसावी आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित विश्वनाथ कान्हेरे यांचे एकल संवादिनी वादन झाले. शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात ही मैफल रंगली.
एकल वादनासाठी स्वतंत्र व्यासपीठ आणि गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे श्रीराम हसबनीस यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मैफलीची सुरुवात अनिरुद्ध गोसावी यांनी पुरिया धनाश्री रागातील मत्ततालातील गतीने केली. त्यानंतर ‘मुश्किल करोगे आसान’ ही रचना सादर करून रसिकांना आपल्या संवादिनी वादन कौशल्याचे दर्शन घडविले. बोरकर गुरुजींनी रचलेली तीन तालातील रचना गोसावी यांनी प्रभावीपणे सादर केली. पहाडी धून ऐकवून त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. त्यांना विघ्नेश कामत यांनी तबला साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायकी अंगाने संवादिनी वादन करण्यात हातोटी असलेल्या ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित विश्वनाथ कान्हेरे यांच्या संवादिनीने रसिकांशी स्वरसंवाद साधला. पंडित कान्हेरे यांनी वादनाची सुरुवात ‘अलख निरंजन कहत गोरखनाथ’ या गोरखकल्याण रागातील बंदिशीने केली. एक तालातील या रचनेने रसिकांना मोहित केले. त्यानंतर जोड राग सादर करताना मधुवंती व भीमपलास रागाची एकरूपता दर्शविणारा मधुपलासी हा राग ऐकविला. जवळपास दोन तास रंगलेल्या या मैफलीत पंडित कान्हेरे यांनी रसिकांच्या आग्रहाखातर बसंत, भुपांगिनी या रागांबरोबरच मिश्रपिलु रागातील अध्धा तीनतालातील रचना ऐकवून वादनाची सांगता भैरवीतील बंदिशीने केली. त्यांना प्रसाद लोहार यांनी समर्पक तबलासाथ केली. वरद सोहनी, श्रीरंग जोगळेकर यांनी संवादिनीवर सहवादन केले.
पंडित कान्हेरे म्हणाले, प्रतिथयश गायक-वादकांकडून मार्गदर्शन मिळाल्याने त्याचा संवादिनी वादनात खूप उपयोग झाला. दोन हजार नाट्यप्रयोग वाजविल्यामुळे जे ऐकू येते ते वाजवायचे असा गुरुमंत्रच मिळाला. गुरूंचा आशीर्वाद माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे. एकल वादन आणि साथ करणे यात फरक असतो. गायकाच्या साथीला वादन करताना त्याचे गाणे खुलवायला वादकाची साथ लाभणे आवश्यक असते. मी गायकांशी असलेली बांधिलकी जपली. संवादिनी या वाद्यावर गायकी अंगाने वाजविणे हे मुलात गायकीची तालिम असल्याशिवाय शक्य नाही अन्यथा स्वरवाद्यावर नुसता तबला वाजतो. नव्या पिढीने चतुरस्त्र होण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. त्यांच्याशी संवादिनी वादक श्रीराम हसबनीस यांनी संवाद साधला.
गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी मनोगत व्यक्त केले.
कलाकारांचा सत्कार पंडित प्रमोद मराठे, ज्ञानेश्वर सोनवणे, सुधीर नायक, श्रीराम हसबनीस यांनी केला. आभार श्रीराम हसबनीस यांनी मानले.