पर्यटन संचालनालय व परभन्ना फाउंडेशनचा पुढाकारडॉ. विश्वास केळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’; ‘टुरिझम, युथ अँड पीस’वर चर्चासत्र
पुणे : जागतिक पर्यटन दिवसानिमित्त पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि परभन्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. यंदा महोत्सवात १५ राज्यांतून आलेल्या ६० लघुपट, माहितीपटांपैकी १२ माहितीपट, तीन लघुपट व एक व्ही-लॉगचे स्क्रीनिंग होणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. २७ सप्टेंबर २०२४) पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र, घोले रोड पुणे येथे हा लघुपट महोत्सव होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मीडिया व मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमख प्रा. डॉ. माधवी रेड्डी, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
पर्यटन लघुपट महोत्सव चार टप्प्यांमध्ये पार पडणार असून, यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, स्क्रीनिंग, चर्चासत्र आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचा समावेश आहे. ‘टुरिझम, युथ अँड पीस’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेसचे संचालक महेश ठाकूर, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम, बजेट ट्रॅव्हलर प्रज्ञेश मोळक, टुरिझम प्रॅक्टिशनर ऋतुजा अचलारे, प्रबुद्ध इंटरनॅशनलचे संस्थापक सिद्धार्थ अहिवळे सहभागी होणार आहेत, अशी माहिती लघुपट महोत्सवाचे प्रमुख गणेश चप्पलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी महोत्सव सल्लागार समितीचे जीवराज चोले, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस प्रा. डॉ. महेश ठाकूर, संचालनालयाचे उपलेखापाल आनंद जोगदंड, संयोजन समितीचे असीम त्रिभुवन, के. अभिजीत, सारंग मोकाटे आदी उपस्थित होते.
गणेश चप्पलवार म्हणाले, “कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यंदाचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. विश्वास केळकर, ‘बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड २०२४’ प्रसाद गावडे (कोकणी रानमाणूस) आणि ‘बेस्ट ऍग्री टुरिझम अवार्ड’ आनंद कृषी पर्यटन केंद्र (आनंद जाधव) यांना प्रदान करण्यात येणार आहे. यासह सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट व्ही-लॉग असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. लघुपट महोत्सवाचे परीक्षक म्हणून अभिनेत्री वैशाली केंदळे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सिमरन जेठवानी यांनी काम पाहिले आहे.”
“दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवसाचे औचित्य साधून परभन्ना फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. भारताच्या पर्यटनाचे विविध रूप, छटा लोकांनी पाहिल्या व अनुभवल्या पाहिजेत. यावर लिहिले आणि वाचले गेले पाहिजे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण कायमच सर्वाना आकर्षित करत असतात. त्याची जगाला ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांनी भारतात येऊन हे पाहावे, ही यामागची भावना आहे.”
– गणेश चप्पलवार, लघुपट महोत्सवाचे प्रमुख