अमनोरा येस फाउंडेशन आणि सहयोगी संस्थेच्या वतीने स्तन कर्करोग तपासणी शिबिर
पुणे : स्तन कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते. महिला त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. कारणे देऊन त्या तपासणी पुढे ढकलतात. रोजच्या धावपळीला विराम देऊन महिलांनी स्तन कर्करोग तपासणी करून घ्यायला हवी. तपासणी करून घेण्यात कोणतेही नुकसान नाही. असे मत ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.
बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, यु इ लाईफसायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय हॉस्पिटल येथे तपासणी शिबिर झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पाठारे, ससूनचे अधिक्षक यल्लप्पा जाधव, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, ससूनच्या शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख लता भोईर, आय ब्रेस्ट च्या गंधाली देसाई, पोलीस उपनिरीक्षक शंकर कुंभारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर टेंभुर्णे, राखीव पोलीस निरीक्षक दशरथ हाटकर, अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. महिला पोलिसांना विनामूल्य कर्करोग तपासणीसाठी हेल्थ कार्ड देखील यावेळी देण्यात आले. शिबिरात १०६ महिला पोलिसांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२ महिला पोलिसांना मॅमोग्राफी तर १० जणींना सोनोग्राफी तपासणी सांगण्यात आली आहे.
भाऊसाहेब पाठारे म्हणाले, महिला पोलिसांसाठी वेळ काढून कर्करोग तपासणीसाठी जाणे अवघड असते. त्यामुळे पोलीस मुख्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन ही तपासणी करण्यात आली, यासाठी सगळ्या संस्थांचे आम्ही आभारी आहोत.
लता भोईर म्हणाल्या, स्तन कर्करोग हे एक युद्ध आहे आणि सर्व महिलांनी मिळून हे युद्ध लढायचे आहे. त्रास होत नसला तरी महिलांनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. गाठ दुखत असेल किंवा नसेल दोन्ही परिस्थितीत तपासणी आवश्यक आहे. महिन्यातून एकदा आयुष्याच्या शेवटपर्यंत तपासणी गरजेची आहे,असेही त्यांनी सांगितले. विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.