नूमवि प्रशालेतील विद्यार्थींनींनी केला स्त्री शक्तीचा जागर : अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाकडे प्रार्थना
पुणे : घाबरु नका पण सावध रहा…महिला आहेत देशाच्या प्रगतीचा आधार करु नका त्यांच्याबद्दल वाईट विचार…स्त्रियांना समजू नका बेकार त्याच आहेत जिवनाचा आधार…नारी आता अबला नाही संघर्ष आमचा चालू राही…जब है नारी मे शक्ती सारी तो फिर क्यों नारी को कहे बेचारी…स्त्री आहे जीवनाचा आधार तिला द्या योग्य सन्मान असा संदेश देत नूमवि प्रशालेतील विद्यार्थींनींनी स्त्री शक्तीचा जागर केला. ‘गणराया आमचे रक्षण कर आम्हाला सक्षम कर’ असे साकडे गणरायाला घातले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूमवि प्रशालेतील २०० विद्यार्थीनींनी अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, जयंत किराड, सुरज थोरात, मुख्याध्यापिका संगीता कांबळे उपस्थित होते.
प्रिय, गणपती बाप्पा कोणत्याही महिलेवर अन्याय नको, अन्यायाचा विचार करणाऱ्याला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना विद्यार्थीनींनी यावेळी केली.
अण्णा थोरात म्हणाले, स्त्री हे शक्तीचे रूप आहे तीच्या समोर नतमस्तक होण्याची आपली संस्कृती आहे. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान आहे परंतु राज्यातील महिला अत्याचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे गणराया तू आमचे रक्षण कर आणि राज्यातील तमाम स्त्रियांना सुरक्षित ठेव असे साकडे २०० विद्यार्थिनींनी मंडईच्या शारदा गजाननाला घातले.