पुणे-शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा देण्याच्या आमिषाने तब्बल १२१ गुंतवणूकदारांना ९ कोटी २ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार २०२३ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत पुणे-बेंगळुरू महामार्गावरील आंबेगाव येथे घडला. साई इंडस ट्रेडिंग आणि साई मल्टी मार्केटिंग नावांच्या कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवेगीरी करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन आरोपी पसार झाला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.
भालचंद्र महादेव अष्टेकर (रा. श्वेता कुंज, साईबाबा मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर भादवि ४२०, ४०९, महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संरक्षण कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजयकुमार मुरलीधर घाटे (रा. शिवणे) यांनी फिर्याद दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भालचंद्र अष्टेकर हा मूळचा बेळगाव इथला राहणार आहे. तो मागील काही वर्षांपासून पुण्यामध्ये राहत होता. पुणे-बेंगलुरु महामार्गावर असलेल्या आंबेगाव येथील आंबेगाव व्हॅली संकुलामध्ये त्याने स्वतःचे ऑफिस सुरू केले होते. ‘साई इंडस मार्केटिंग’ आणि ‘साई मल्टी सर्विसेस’ या नावाने त्याने शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केलेला होता. त्याची घाटे यांच्यासोबत ओळख झाली. घाटे यांना त्याने गुंतवणुकीवर दरमहा चार ते पंधरा टक्के दराने परतावा दिला जाईल तसेच मूळ रक्कम दुप्पट करून दिली जाईल अशी आमिषे दाखवली.
त्याच्या भूलथापांना बळी पडलेल्या घाटे यांनी आरोपीने सांगितल्याप्रमाणे दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली. घाटे यांच्याप्रमाणेच अन्य १२० गुंतवणूकदारांनी देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. गुंतवणूक करून घेताना सर्वांचे करारनामे करून घेण्यात आले. गुंतवणूकदारांना विश्वास बसावा या करता त्यांना पुढील तारखेचे धनादेश (पोस्ट डेटेड चेक) दिले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास त्याच्यावर बसला. सुरुवातीचे काही महिने आरोपीने त्यांना थोडा थोडा परतावा दिला. मात्र, मागील तीन-चार महिन्यांपासून त्याने परतावा देणे बंद केले. थोडे दिवस वाट पाहिल्यानंतर गुंतवणूकदारांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क होत नव्हता. त्याच्या फोनवर संपर्क केला असता त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. तसेच, त्याने ऑफिस देखील बंद केले होते. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. काही दिवस प्रयत्न केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे यासंबंधी तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जाचा तपास करून याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी अष्टेकरकडे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, गरीब अशा आर्थिक स्तरांमधील अनेकांनी गुंतवणूक केलेली आहे. काही जणांनी कर्ज काढून त्याच्याकडे पैसे गुंतवले होते. अनेकांची सेवानिवृत्तीची रक्कम घेऊन तो पसार झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असू शकते. तसेच, तक्रारदार आणि त्यांची फसवणूक झालेल्या रकमेचा आकडा देखील वाढू शकतो.
या संदर्भात तपास अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ म्हणाल्या, की भालचंद्र अष्टेकर हा चार ते पंधरा टक्के दराने दरमहा परतावा देतो असे सांगून लोकांना भूल थापा देत होता. त्याने अनेकांकडून कोट्यावधी रुपयांची रक्कम उकळली. शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे लावून नफा कमवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. तसेच, मूळ रक्कम दुप्पट करून देण्याच्या नावाने त्याने अनेक बनावट स्कीम देखील काढलेल्या होत्या. मात्र, गुंतवणूकदारांची फसवणूक करून तो पसार झाला आहे. यासंबंधी पुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत, असे भुजबळ म्हणाल्या