पुणे, ता. ७: सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवान विष्णूचा तिसरा अवतार असलेल्या श्री वराह भगवान यांचा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील कोंढवा बुद्रुक, हडपसर, कसबा पेठ, पर्वती, कात्रज, दौंडसह सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यांतही हा जयंती सोहळा झाला. कोंढव्यातील प्रतिभाताई पवार शाळेच्या पटांगणात वराह जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. तसेच काळभैरवनाथ मंदिरात होमहवन करण्यात आले. महिला भजनी मंडळाची भजनसेवा, नादगर्जना ढोलताशा पथकाचे मनोहारी वादन व श्री वराह देवांच्या महाआरतीने जयंती सोहळ्याची सांगता झाली.
भगवान श्री विष्णूंचा तिसरा अवतार असलेल्या श्री वराह देवांनी हिरण्यक्ष राक्षसाचा वध करून धर्म रक्षण आणि मानव कल्याणासाठी पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना केली. दुष्ट प्रवृत्तीचा वध करून धर्माचे व मानवाचे रक्षण करणाऱ्या श्री वराह देवांचे जयंतीच्या निमित्ताने स्मरण करण्याचा व त्यांना भक्तिभावाने पुजण्याचा हा दिवस असल्याचे सकल हिंदू समाजाच्या वतीने नमूद करण्यात आले.