यवतमाळ-भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्यासोबत ठेका धरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. धुर्वे हे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना धुर्वे हे नाच-गाण्यात दंग असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.यवतमाळ जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची याचना करत असताना भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटीलसोबतचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप आमदार नामदेव ससाणे व भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी 3 सप्टेंबर रोजी उमरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मेदानावर दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील यांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी एका हिंदी गाण्यावर भन्नाट डान्स केला.
दहीहंडीच्या कार्यक्रमाला गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यातच सत्ताधारी भाजपच्याच आमदाराने गौतमीसोबत ताल धरल्यामुळे एकच गजहब झाला. यासंबंधीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत आमदार संदीप धुर्वे हे गौतमीच्या मागे-पुढे करत एका हिंदी गाण्यावर नाचताना दिसून येत आहेत. एकेक्षणी गौतमी या प्रकाराला कंटाळून मागे जाते. पण नंतर ती पुन्हा परत येऊन आमदारांसोबत काहीवेळ डान्स करते.
उल्लेखनीय बाब म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात यंदा ओला दुष्काळ्याची स्थिती आहे. गत 4 दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांतील पूरस्थिती अद्याप ओसरली नाही. या स्थितीत सत्ताधारी पक्षाकडून संवेदनशीलतेची अपेक्षा केली जाते. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा असते. पण तेच अशा कार्यक्रमांत नाचगाणे करत असल्यामुळे जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दुसरीकडे, भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी विरोधकांची ही टीका फेटाळून लावली आहे. जिल्ह्यात पूरस्थिती आहे. या प्रकरणी भाजपचे सर्वच नेते पूरग्रस्त भागाला भेटी देऊन स्थितीचा आढावा घेत आहेत. पण गौतमी पाटीलचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्याचे नियोजन पूर्ण झाले होते. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करणे संयुक्तिक नव्हते. या कार्यक्रमात आमदार संदीप धुर्वे यांनी केलेला डान्स हा उत्स्फुर्त होता, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कार्यक्रमाला नितीन भुतडा मित्र परिवाराने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना बोलावले होते.
भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या‘
काँग्रेसने अतिशय कडक शब्दांत या प्रकरणी आमदार संदीप धुर्वे यांचा समाचार घेतला आहे. भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या‘ आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे. झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करत आहेत? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या – शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते.आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.