मुंबई-जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्र राज्याची निवडणुकही होणार होती. परंतु, निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र सध्या या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री मुंबईतील चांदिवली भागात बोलत असतांना म्हणाले की, पुढच्या दोन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असल्याचे संकते त्यांनी दिले. त्या निवडणुकीत तुम्हाला आमच्या आमदाराला निवडून आणावे लागणार असल्याचेही ते म्हणालेत.सध्या चांदिवलीमधून दिलीप मामा लांडे हे आमदार आहेत. यावेळी शिंदेंनी दिलीप मामा यांना लोकांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे, त्यांना समर्थन करावे, असे आवाहन देखील केले आहे.
जम्मू-काश्मीर हरियाणासोबत महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र आयोगाच्या कार्यक्रमात समावेश नव्हता. त्यामुळे आता निवडणूक दिवाळीनंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यात जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात पाऊस झाल्याने बीएलओंची कामे झालेली नाहीत. या राज्यात गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र, दिवाळी यासारखे सण आहेत. सुरक्षा बलाचाही मुद्दा आहे. याचा विचार करून फक्त 2 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्याचे आयोगाने सांगितले. 2019 मध्ये 20 ऑक्टोबरला मतदान झाले होते, या वेळी तीन आठवडे ते एक महिना उशिरा निवडणूक होऊ शकते. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे.