पुणे- लाल महाल, नाना वाडा, शनिवारवाडा तसेच शहरातील उड्डाण पूल तसेच मुठा नदीवरील विविध पूल येथे रोषणाई आणि एकूण ३८२ ठिकाणांवर विसर्जन हौद, आवश्यक तिथे सीसी टीव्ही , प्रकाश व्यवस्था अशा विविध कामांची काहणी करून गणेश उत्सवाच्या स्वागतासाठी , आणि जबाबदारी साठी पुणे महापालिका सज्ज झाली आहे.
श्री गणेशोत्सव २०२४ करिता पुणे महानगरपालिका विद्युत विभागामार्फत विसर्जन घाट आणि हौदांवर नागरिकांच्या सोयीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे सेवा पुरविण्यात येत आहेत.
परिमंडळ क्रमांक १ मध्ये एकूण ६३ ठिकाणी, परिमंडळ क्रमांक २ मध्ये एकूण ५६ ठिकाणी, परिमंडळ क्रमांक ३ मध्ये एकूण १२१ ठिकाणी, परिमंडळ क्रमांक ४ मध्ये एकूण ६७ ठिकाणी ठिकाणी तसेच परिमंडळ क्रमांक ५ मध्ये एकूण ७५ ठिकाणी असे संपूर्ण पुणे शहरात २१ घाटांवर बांधलेले हौद तसेच इतर ठिकाणचे ३६१ हौद असे एकूण ३८२ ठिकाणांवर बांधलेल्या मंडपांवर तात्पुरती प्रकाशव्यवस्था ध्वनी व्यवस्था तसेच आवश्यकतेनुसार तात्पुरती जनरेटर व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच पोलिसांच्या मागणीनुसार घाटांवर तात्पुरती सी सी टी व्ही व्यवस्था देखील उपलब्ध करण्यात येत आहे.
विसर्जन हौदांवर नागरिकांना विद्युतविषयक येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे श्री गणेशोत्सव २०२४ साठी उपलब्ध असलेले क्षेत्रीय कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी यांचे दूरध्वनी क्रमांक विसर्जन हौदांवर उपलब्ध करण्यात येत आहेत.
श्री गणेशोत्सव २०२४ मध्ये पुणे शहरातील श्री गणपतींचे देखावे पाहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी पुण्याचे ऐतिहासिक वैभव असणाऱ्या लाल महाल, नाना वाडा, शनिवारवाडा तसेच शहरातील उड्डाण पूल तसेच मुठा नदीवरील विविध पूल येथे आकर्षक प्रकाश व्यवस्था करून पुणे शहरातील या महत्वाच्या ठिकाणांचे विद्युतविषयक सुशोभीकरण करण्यात येत आहे. तसेच पोलिसांच्या मागणीनुसार फरासखाना पोलीस चौकी ते दत्त मंदिर चौक येथील फूटपाथवर नागरिकांच्या सोयीसाठी पथदिव्यांव्यतिरिक्त अतिरिक्त प्रकाशव्यवस्था करण्यात येत आहे.
श्री गणेशोत्सव २०२४ मधील विसर्जन सोहळ्यासाठी अलका टॉकिज चौक येथे उभारण्यात येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या स्वागत मंडपामध्ये तात्पुरती प्रकाशव्यवस्था, ध्वनी व्यवस्था, जनरेटर व्यवस्था तसेच सी सी टी व्ही व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे.