‘आरव’ पुणे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन : इनॉक डॅनियल्स यांची मुलाखत व सन्मान
पुणे : शांतारामबापूंचा चिकित्सक स्वभाव, राम कदम यांची अथक कार्यशैली. सी. रामचंद्र यांच्याकडे श्री.. इनॉक यांनी केलेले काम, रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या पिंजरा चित्रपटातील गाण्यांची कहाणी … असे एक ना अनेक किस्से इनाॅक डॅनियल्स यांनी रसिक श्रोत्यांसमोर उलगडले.
गेली सहा दशके आपल्या अकॉर्डियन आणि पियानो वादनाच्या सुरवटीने रसिक हृदयाच्या तारा छेडणारे ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स यांची मुलाखत रंगली. त्यांनी आपल्या संगीत संयोजनाने आणि वादनाने गाण्याला भरजरी रूप दिले. अशा अप्रतिम गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेला तो सुवर्ण काळ पुन्हा अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
‘आरव’,पुणे प्रस्तुत “ही कुणी छेडिली तार..” या कार्यक्रमाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेच्या प्रांगणातील गणेश सभागृता करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स यांच्या मुलाखतीत सांगीतिक कारकीर्दीचा आढावा घेण्यात आला. संगीतकार व गायक निखील महामुनी यांनी इनॉक डॅनियल्स यांची मुलाखत घेत, त्यांच्या सांगीतिक जीवन प्रवास उलगडला. यावेळी त्यांनी संयोजित केलेल्या काही मोजक्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले.
गायिका ऋचा महामुनी, श्रीया महामुनी, डॉ. अनुराधा गोगटे, सुशांत कुलकर्णी यांनी गाण्यांचे सादरीकरण केले. यावेळी केदार परांजपे (सिंथेसायजर), गिरीश महामुनी (तबला), दीप्ती कुलकर्णी ( हार्मोनियम), पराग जोशी गिटार ), संजय खाडे (रीदम मशीन ) यांनी साथसंगत केली.विजय पाटणकर आणि रेखा पाटणकर यांच्या हस्ते इनॉक डॅनियल्स यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात इनॉक डॅनियल्स यांनी संगीत संयोजन आणि वादन केलेल्या मराठी सिनेसृष्टीतील पिंजरा, गुळाचा गणपती, शापित, घरकुल, सामना अशा निवडक चित्रपटातील गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. मुलाखती दरम्यान डॅनियल्स यांनी बालपणापासून त्यांच्यावर झालेले सुरांचे संस्कार, अनेक लोकप्रिय गाण्यांच्या जन्म कथा आणि अनेक दिग्गज कलाकारांबरोबर आलेले अनुभव या सगळ्या आठवणींना उजाळा दिला.
आठवणींचा एक-एक पदर उलगडत गेला तसा, संगीत क्षेत्रातला काळ रसिकांच्या दृष्टीपटलावरून पुढे जात राहिला तशी मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. ” इनॉक डॅनियल्स यांच्यासारखी माणसं अत्यंत दुर्मिळ आहेत, त्यांना जपायला हवं, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे” अशी भावना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी त्यांच्या ध्वनी चित्रफिती मार्फत व्यक्त केली.
मलमली तारुण्य माझे…सख्या रे घायाळ मी हरणी…धरीला पंढरीचा चोर… कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे… तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव अशा अनेक गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. किरण पोतदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. निखील महामुनी यांनी आभार मानले.