पुण्यात प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे आयोजन ; उद्योजक पुनीत बालन यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : सुखकर्ता आणि विघ्नहर्ता अशी ओळख असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना दरवर्षी घरोघरी होत असते. समाजाच्या प्रत्येक स्तरातील कुटुंबात गणरायाचे पूजन केले जाते. त्यामुळेच गणपती तुमचा किंमतही तुमची हा अनोखा उपक्रम पुण्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत यंदा ७ हजार गणेश मूर्तींचे वाटप पुणेकरांना करण्यात आले.
प्रल्हाद गवळी मित्र परिवारतर्फे रविवार पेठेतील पावटे आळी येथील संत नामदेव चौकात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मूर्ती वितरणप्रसंगी उद्योजक पुनीत बालन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, अजय शिंदे, अॅड.गणेश सातपुते, रणजित शिरोळे, आयोजक प्रल्हाद गवळी, साईनाथ चकोर, विक्रम लगड, विकास गवळी, नरेश देवकर, जीवन गायकवाड, गौरव गवळी, हेमंत कंठाळे, महेश चव्हाण, विशाल ओदेल आदी उपस्थित होते.
सध्या सगळीकडे सुंदर रंगांनी सजवलेले, विविध आकाराच्या गणपती बाप्पांच्या मोहात पाडणा-या मूर्ती दिसत आहेत. पण या मूर्तींची किंमत अनेकांना परवडणारी नसते. लहान मुलांचा देखील हट्ट असतोच की मोठी बाप्पांची मूर्ती हवी. या गोष्टींचा विचार करत प्रल्हाद गवळी मित्र परिवारातर्फे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठेत हा उपक्रम राबविला आहे.
यंदा ७ हजार गणेश मूर्ती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती असून नागरिकांनी मूर्तीची किंमत ठरवून कलशामध्ये ती रक्कम टाकायची आहे. कोविड काळापासून ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हल्ली गणेश मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. अनेक कुटुंबांना या मोठ्या मूर्ती घेणे शक्य होत नाही, पण मोठ्या मूर्ती घेण्याचा मुलांचा हट्ट असतो. यामुळे मूर्ती आमची किंमत तुमची या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कोणाकडे पैसे नसतील तर विनामूल्य मूर्ती देखील देण्यात येते, असे हा उपक्रम सुरु करणारे प्रल्हाद गवळी यांनी सांगितले.