पुणे- पोलीसनामाचे बातमीदार प्रसाद गजानन गोसावी यांचे आज निधन झाले. ते ४५ वर्षाचे होते. त्यांच्या मागे भाऊ, 2 बहिणी, 2 पुतणे असा परिवार आहे. अपघातानंतर तब्बल सव्वा महिन्याच्या संघर्षानंतर आज त्यांची प्राणज्योत मालविली.
प्रसाद गोसावी हे पोलीसनामा ऑनलाईन मध्ये पहिल्या दिवसापासून वरिष्ठ बातमीदार म्हणून कार्यरत होते. कामावरुन घरी जात असताना २२ जुलै रोजी रात्री १० वाजता खडकी रेल्वे स्टेशनजवळ त्यांची गाडी स्लीप झाल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना तातडीने पिंपरीतील वाय सीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. गेले सव्वा महिना त्यांनी संघर्ष केला. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. डॉक्टरांनी रविवारी सकाळी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. प्रसाद यांचे अवयव दान करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
प्रसाद गोसावी यांच्या पार्थिवावर निगडी स्मशानभूमीमध्ये आज (रविवार) रात्री ९ वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.