मुंबई- आता महाविकास आघाडीने एका व्हिडिओद्वारे विरोधकांनी छत्रपतींची माफी मागत त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांचा शेवट केल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी तातडीची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यासाठी महायुती सरकारचा भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी सरकारने कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता घाईघाईत या पुतळ्याचे अनावरण केले, असे ते म्हणाले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पण ते करताना कोणतीही प्रक्रिया पाळली गेली नाही. केवळ आम्ही शिवप्रेमी आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला. हे लोक शिवद्रोही आहेत. या लोकांनी शिवाजी महाराजांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर ठेवला. हा महाराजांचा अपमान आहे. आम्ही एका व्हिडिओद्वारे या प्रकरणी आपली भूमिका विषद केली आहे.
काय आहे महाविकास आघाडीच्या व्हिडिओत?
नाना पटोले यांनी यांनी यावेळी एक व्हिडिओ जाहीर केला. या व्हिडिओद्वारे झाल्या प्रकाराबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागत त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करण्याचा चंग बांधण्यात आला आहे. खाली वाचा व्हिडिओत काय आहे ते…
व्हिडिओत म्हटले आहे की, माफ करा महाराज, माफ करा. तुमच्या पुतळ्याच्या अवस्थेला आम्हीच कारणीभूत आहोत. महाराज आम्ही यांच्या मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासनांना बळी पडलो. आम्हाला माती आणि सोन्यातला फरकच कळला नाही. महाराज तुम्ही उभारलेल्या गडकिल्ल्यांचा प्रत्येक दगड आजही शाबूत आहे. पण भ्रष्ट महायुतीने उभारलेला पुतळा 8 महिनेही टिकला नाही. महाराज तुम्ही स्वराज्याचे हित पाहिले, रयतेचे हित पाहिले. पण या भ्रष्ट युतीच्या नेत्यांनी स्वत:चेच भले केले.
महाराज आम्हीच दोषी आहोत. कारण आम्ही तुमच्या पुतळ्यांच्या बाबतीत नेते म्हणून यांच्यावर भरवसा टाकला. पण यांनी कमिशनसाठी लाडका कॉन्ट्रॅक्टरच गाठला. महाराज तुमचे नाव घेऊन सत्तेत येणारी लोकं, तुमच्यासोबतही नीच वागली. घात झाला महाराज, घात झाला. इथेच आमच्या वेड्या भावनेचा घात झाला. तुमच्या पुतळ्यांमध्येही यांनी टक्केवारीचाच डाव केला. पुतळा निर्मिताला दोन वर्ष लागतात, पण निवडणुकीच्या तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी तीन – चार महिन्यांत घाईत पुतळा निर्माण केला. महाराज सिमेंटमध्ये जान असून चालत नाही, काम करणाऱ्यांच्या रक्तात इमान असायला पाहिजे, याचा आम्हाला विसर पडला.
तुमच्या लोककल्याणकारी विचारांना पायदळी तुडवून यांनी मोठा अपराध केला. निवडणुकीसाठी फक्त तुमच्या नावाचा जयघोष केला महाराज. यांना कधीही महाराजांच्या विचारांची, तत्त्वांची आणि कार्याची कदरच नव्हती. त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची अशी अवस्था केली. यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे. दुसरे काहीही नाही. पण माफ करा महाराज या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो. आम्ही कधीकाळी डोक्यावर घेऊन नाचलो. पण आता तुमची शपथ… यांना सोडणार नाही… तुमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे या व्हिडिओत नमूद करण्यात आले आहे.