पुणे: पॅराग्लाईडींग, पॅरामोटर, हॉटएअरबलूनसारखे साहसी खेळ, दिव्यांग व अनाथाश्रमातील मुलांना विमानप्रवास, महिला व युवकांना रोजगार, जी-२० परिषद, अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सवातील सहभाग, क्रूजवर पहिला मराठी लग्नसोहळा अशा उल्लेखनीय पर्यटन सफरी करत गेल्या अकरा वर्षात एक लाख लोकांना व्यावसायिक व सामाजिक भावनेतून जोडल्याचे समाधान आहे, अशी भावना स्मिता ग्रुपचे संस्थापक जयंत गोरे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील आघाडीची संस्था स्मिता ग्रुपने नुकताच आपला एक लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा महत्वाचा टप्पा गाठला आहे. विशेष लक्ष्यपूर्ती सोहळा व ११ वा वर्धापन दिन स्मिता ग्रुपच्या महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये साजरा करण्यात आला. स्मिता ग्रुपच्या प्रत्येक कार्यालयात तिरुपती बालाजी भगवान यांची भव्य मूर्ती स्थापित करून बालाजी पूजनाने सोहळ्याची सुरवात झाली. गुंतवणूकदार, पर्यटक, हितचिंतकांनी उपस्थित लावत शुभेच्छांचा वर्षाव केला.
पुण्यातील डीपी रस्त्यावरील स्मिता हॉलिडेजच्या कार्यालयातही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसंगी स्मिता हॉलिडेजच्या संचालक स्मिता गोरे, प्रज्ञा गोरे, स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्विसेसच्या संचालक स्वाती जोशी, योगेश्वरी रामदासी, स्मिता हॉलिडेजचे भागीदार विवेक मोहरीर, श्रीरंग देशपांडे, स्मिता हॉलिडेजचे चॅनल पार्टनर व मराठवाडा पर्यटन विकास संगटनेचे उपाध्यक्ष किरण देशपांडे, सचिव सागर पाटील आदी उपस्थित होते.
जयंत गोरे म्हणाले, “गुंतवणूक, पर्यटन आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या ११ वर्षात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पर्यटन वाढीसाठी, तसेच मराठवाड्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले. महिलांसाठी पर्यटन कार्यशाळा घेतल्या. १०० युवकांना रोजगार दिला. पूर्वरंग, उत्तररंग असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. ‘एक झाड आपल्यासाठी’ उपक्रमात ३००० झाडांचे वाटप केले. प्लास्टिक मुक्त टेकड्या अभियान, मराठवाड्याच्या पर्यटन वाढीसाठी आठ जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम, चार्टर्ड प्लेनद्वारे राजस्थान पर्यटन घडविण्यात पुढाकार घेतला.”