पुणे : कोविडच्या काळात गणेशोत्सव कार्यकर्त्यांची एक वेगळी ओळख समाजाला झाली. ज्यावेळी कोणीच रस्त्यावर नव्हते त्यावेळी गणेशोत्सव कार्यकर्ता रस्त्यावर उतरून काम करत होता. गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता नगरसेवक, महापौर आणि देशाचा मंत्री देखील होऊ शकतो ही गणेशोत्सवाची ताकद आहे. डीजे लावून नाचणारा कार्यकर्ता अशी गणेशोत्सव कार्यकर्त्यांची ओळख नाही, त्याला समाजाचे भान आहे. संकटकाळी तो समाजासाठी उभा राहतो. ही ओळख जपणे हे कार्यकर्त्यांसमोरील आव्हान आहे, असे मत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
पुणे परिवारच्या वतीने पुण्याच्या गणेशोत्सवात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यंदाचा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांना प्रदान करण्यात आला. सप महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गणेशोत्सव कार्यकर्त्यांना ‘आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ख्यातनाम उद्योजक पुनीत बालन, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विजय कुवळेकर, हेमंत रासने,पुणे परिवारचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, कार्याध्यक्ष विनायक घाटे, उपाध्यक्ष शिरीष मोहिते, प्रकाश ढमढेरे यावेळी उपस्थित होते.
परिमंडल १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांना लोकमान्य गणेश सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर अमित पळसकर, सचिन पवार, रविंद्र पठारे, हर्षद नवले, अंकुश जाधव यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रुद्रगर्जना वाद्यपथक आणि भालचंद्र देशमुख, युसुफ बागवान यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रंजन कुमार शर्मा म्हणाले, गणेशोत्सवामध्ये फक्त हिंदू समाजाचे लोक सहभागी होत नाहीत, तर सर्व समाजाचे लोक सहभागी होतात त्यामुळे या उत्सवाचे एक विशिष्ट स्थान आहे. हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि भारतीय संस्कृतीचा उत्सव आहे. गणपती मंडळांनी जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ड्रग्सचे प्रमाण कमी होण्यासाठी देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधन करा. याचा नवीन पिढी आणि समाजाला उपयोग होईल. काहीही अडचण आल्यास पुणे पोलीस तुमच्या मागे खंबीरपणे मदतीसाठी उभे आहे. असेही त्यांनी सांगितले
पुनीत बालन म्हणाले, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे परंतु पुण्यावर कोणतेही संकट आल्यावर मदतीला जो उभा राहतो तो गणेशोत्सव कार्यकर्ता आहे. उत्सवाच्या केवळ दहा दिवसच नाही तर वर्षभर हा कार्यकर्ता काम करत असतो. त्यामुळे या कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी तीन कोटींची तरतूद पुनीत बालन ग्रुप तर्फे करण्यात आली आहे.
विजय कुवळेकर हेमंत रासने, अॅड. प्रताप परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक घाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश ढमढेरे यांनी आभार मानले.
गणेशोत्सव आणि कार्यकर्ता हा माझा प्रवास आहे. माजी आमदार, माजी खासदार असतो परंतु कार्यकर्ता कधीही माजी होत नाही तो कायम कार्यकर्ता असतो. गणेशोत्सव कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक वेगळे जीवन मी अनुभवले आहे त्यामुळे मंडळाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान वाटतो. – मुरलीधर मोहोळ(केंद्रीय मंत्री )