मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सत्ताधारी महायुतीमध्ये मोठी आदळआपट सुरू झाली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी थेट महायुती तोडण्याची भाषा केली आहे.भाजपच्या संयमाला कुणीही दुबळेपणा समजू नये. महायुतीची गरज एकट्या भाजपला नाही, तर सर्वांना आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या विधानाला मोठे महत्त्व आले आहे.
रामदास कदम यांनी मुंबई – गोवा महामार्गावरून भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत. ते केवळ चमकोगिरी करतात. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार करत रामदास कदम यांचे थोबाड फोडण्याची भाषा केली होती. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट महायुती तोडण्याची भाषा केली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, रामदास कदम हे महायुतीतील ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्याविषयी केलेले विधान अत्यंत अपरिपक्वतेचे आहे. त्यांच्या काही समस्या असतील, तर त्यांनी ती चार भिंतीच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडाव्यात. पण त्यांचा स्वभाव हा खळबळजनक बोलण्याचा आहे. महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळावा. अन्यथा आम्हालाही आरे ला कारे म्हणता येते.
प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, रत्नागिरीत आमचे 3 आमदार आहेत. ठाण्यात नरेश म्हस्के यांना पक्षाने खासदारकी दिली. रवींद्र वायकर यांनाही आमच्या लोकांनी विजयी केले. नाशिकची जागाही आम्ही शिंदे गटाला दिली. त्यामुळे तुम्ही उणीदुणी काढत असाल तर आम्हीही तयार आहोत. महायुतीची गरज केवळ भाजपला नाही. सर्वांना आहे. एवढे चांगले वातावरण असताना कुणीही मिठाचा खडा टाकू नये. आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत.
प्रवीण दरेकर यांनी यावेळी रामदास कदम वैफल्यग्रस्त झाल्याचीही टीका केली. रामदास कदम यांचा मुलगा जेथून आमदार आहे, तिथे त्यांना भाजपच्या मदतीशिवाय निवडून येता येत नाही. त्यांच्या मुलाची मंत्री होण्याची इच्छा होती. पण ते मिळाले नाही. यामुळे राजकीय पटलावरून गायब झाल्यामुळे रामदास कदम वैफल्यग्रस्त झालेत. यातून त्यांची खदखद बाहेर येत आहे. भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे. राज्यभर आमचे जाळे व संघटना आहे. त्यामुळे आमच्या संयमाला कुणीही आमचे दुबळेपण समजू नये, असे ते या प्रकरणी शिवसेनेला इशारा देत म्हणाले.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी रामदास कदम यांच्यावर शरसंधान साधले. अशाप्रकारचे आरोप कोणत्या युती धर्मात बसतात. रामदास कदम यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडावेत. प्रत्येकवेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यातून चांगली भावना तयार होती. मी रामदास भाईंचे म्हणणे जाणून घेईल, असे फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले होते रामदास कदम?
रामदास कदम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविषयी बोलताना म्हणाले होते की, मागील 14 वर्षांपासून मुंबई – गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम 3 वर्षांत पूर्ण होते. मग मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही? रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेची एलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असे ते म्हणाले होते.