नागपूर -लोकसभा निवडणुकीच्या आधी I.N.D.I.A.ने पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांचा चेहरा घोषित केला असता तर देशामध्ये आणखी 25 ते 30 जागा अतिरिक्त निवडून आल्या असत्या, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत केली होती. मात्र, काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यास विरोध करण्यात येत आहे. यातच नागपूर येथे संजय राऊत यांनी यासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घोषित झाले असते तर आणखी जास्ती जागा निवडून आल्या असत्या, असा दावा करत मुख्यमंत्री पदाबाबत नावाची घोषणा व्हावी, असे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या वतीने संजय राऊत यांनी म्हटले आहे.
वास्तविक उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, संजय राऊत यांच्या दाव्यानंतर काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याला विरोध करण्यात आला होता. आधी विधानसभा निवडणूक हीच आमची प्राथमिकता असून ज्या पक्षाचे जास्त आमदार, त्या पक्षाचा मुख्यमंत्री, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील काँग्रेसच्या या भूमिकेला अनुमोदन दिले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत मतभेद असल्याचे बोलले जात होते. मात्र संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित होणे महत्त्वाचे असल्याचे सांगताना वरील उदाहरण दिले आहे.