आयुर्वेद टिचर्स असोसिएशनच्या वतीने ‘आयुर्वेदातील नवी क्षितीजे’ याविषयी पुण्यात सहावी आटॅकॉन २०२४ राष्ट्रीय परिषद ; डॉ.प्रकाश खापर्डे, प्रा.डॉ.चतुर्भुज भुयान यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे : सर्व आधुनिक विकास व तंत्रज्ञानाचा अवलंब करा आणि आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकीय विज्ञान किंवा आधुनिक आरोग्य शास्त्रात विकसित करून पुढे जा. आयुर्वेद जितका प्राचीन आहे, तितकाच आधुनिक आहे, असे मत राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाचे अध्यक्ष डॉ. रघुराम भट्ट यांनी व्यक्त केले.
आयुर्वेद टिचर्स असोसिएशनतर्फे भारतीय औषध प्रणाली राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तसेच एमसीआयएम, मुंबई यांच्या सहयोगाने ‘आयुर्वेदातील नवी क्षितीजे’ या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शिवदर्शन येथील राजीव गांधी अॅॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग स्कूल येथे करण्यात आले होते.
यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राहुल सूर्यवंशी, सचिव डॉ. नितीन चांदुरकर, खजिनदार डॉ.नितीन वाघमारे, डॉ. प्रदीपकुमार जोंधळे, डॉ. सचिन चांडलीया, डॉ. क्षितिजा शिंदे, डॉ. संदीप जाधव, डॉ. प्रमोद खोब्रागडे,आदी उपस्थित होते. परिषदेत यंदाचा जीवनगौरव पुरस्कार आयुर्वेदाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उस्मानाबादचे डॉ. प्रकाश खापर्डे आणि ओडिसातील प्रा.डॉ.चतुर्भुज भुयान यांना प्रदान करण्यात आला.
रघुराम भट्ट म्हणाले, शिक्षणाचा दर्जा उंचावणे ही आपली जबाबदारी आहे. जर आपण ते मिशन म्हणून घेतले हा दर्जा आधुनिक काळाच्या दृष्टीने नक्कीच शक्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकसित करा जेणेकरून ते आत्मविश्वासाने आयुर्वेदिक वैद्य म्हणून पुढे येऊ शकतील.आपण ठरवले आणि केले तर आयुर्वेदाचे शिक्षण जागतिक दर्जाचे बनू शकते. आपले प्राचिन आयुर्वेदिक शिक्षण जागतिक पातळीवर आणा, असेही त्यांनी सांगितले.
जयंत आसगावकर म्हणाले, केंद्रात जसे आयुष्य मंत्रालय आहे तसेच राज्यात देखील असायला हवे. तर आयुर्वेदाला मोठा आधार मिळेल. औषधे घेऊन त्याचे दुष्परिणाम होतात हे कोविड नंतर आपण सगळ्यांनी पाहिले आहे. परंतु आयुर्वेद औषधांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. आयुर्वेद हा पाया असल्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा.
डॉ.राहुल सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन, मुंबई यांच्या मान्यतेने ही परिषद झाली. परिषदेत विविध ५०० हून अधिक शोधनिबंध, पोस्टर्स, शोधप्रबंधांचे सादरीकरण झाले. ‘आयुर्वेदातील नवी क्षितीजे’ या संकल्पनेवर आधारित यंदाची परिषद झाली. आयुर्वेदाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, कृत्रिम बुद्धिमत्ता व आयुर्वेद तसेच वैद्यकीय शास्त्र, विदेशातील आयुर्वेद व संधी, आवाजासाठी आयुर्वेद, युरोलॉजी, विद्धकर्म, आयुर्वेद शास्त्रातील विविध संधी, असाध्य व्याधी व आयुर्वेद यांसारख्या अनेक विषयांवर तज्ञांनी विचार मांडले.
शनिवार, दि. १७ आॅगस्ट रोजी आॅनलाईन पद्धतीने केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था संचालक डॉ. रविनारायण आचार्य, डॉ. प्रतिभा शाह आयुर्वेद सल्लागार बोस्टन अमेरिका, टी सुरेश कुमार यांच्यासह इतर आयुर्वेद तज्ञांनी संबोधित केले. आयुर्वेद शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशभरात कार्यरत प्राध्यापक, संशोधक, चिकित्सक, औषधे कंपनी यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. भारतभरातील तज्ञ डॉ. सुभाष रानडे, डॉ. रोहित साने, डॉ. चंद्रकुमार देशमुख व इतर वैद्यांनी आपले विचार मांडले. पुण्यासह नवी दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तराखंड, गोवा येथील आयुर्वेद तज्ञांनी यामध्ये मार्गदर्शन केले.