आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती स्थापन होणार
नवी दिल्ली-
पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरविरुद्ध घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA) हा निवासी डॉक्टर संघटनेचा महासंघ, भारतीय वैद्यकीय संस्था (इंडियन मेडिकल असोसिएशन-IMA) आणि दिल्लीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनांनी, नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची भेट घेतली आहे.
कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या सुरक्षितता आणि संरक्षणविषयक समस्यांबद्दलच्या त्यांच्या मागण्या, या संघटनांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयापुढे मांडल्या आहेत. प्रतिनिधींनी मांडलेल्या या मागण्या, मंत्रालयाने ऐकल्या आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सरकारला परिस्थितीची जाणीव असून त्यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील असल्याची भावना, मंत्रालयाने सर्व संघटनांच्या या प्रतिनिधींकडे व्यक्त केली. 26 राज्यांनी आपापल्या राज्यात आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी आधीच कायदे संमत केले असल्याचे आढळून आले आहे. संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंता लक्षात घेत, मंत्रालयाने त्यांना आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य त्या सर्व उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारांसह सर्व संबंधितांच्या प्रतिनिधींना त्यांच्या सूचना समितीसमोर मांडण्यासाठी, सरकार आमंत्रित करणार आहे.
व्यापक लोकहित आणि डेंग्यू- मलेरियाची वाढती प्रकरणे लक्षात घेत, आपापल्या कामावर पुन्हा रुजू होण्याची विनंती, मंत्रालयाने आंदोलक डॉक्टरांना केली आहे.

